पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या फुल बाजारासाठी आता शेजारील क्रोमा शोरुमजवळ असेलेल्या (स. नं. २१० पैकी भूखंड क्र. २ ) उपलब्ध करुन देण्याबाबत महापालिका प्रशासनाने तयारी दर्शवली आहे.
त्यामुळे फुलबाजार प्रशस्त होणार असून, व्यापारी आणि ग्राहकांसह शेतकऱ्यांचीही सुविधा होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख प्रलंबित प्रश्नांसदर्भात भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी महापालिका भवनामध्ये बैठक घेतली होती.
यावेळी पिंपरी- शगुन चौक येथील फुलबाजारासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करणेबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी महापालिका प्रशासक व आयुक्त आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे-पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, कर संकलन विभागाचे सहआयुक्त निलेश देशमुख, शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत, प्रशासन अधिकारी संजय नायकडे उपस्थित होते.
कर संकलन विभागाचे सह आयुक्त निलेश देखमुख म्हणाले की, क्रोमा शोरुमशेजारील सुविधा भूखंड क्र. २१० मधील जागा पिंपरी फुल मार्केटकरीता हस्तांतरित करण्याबाबत प्रस्ताव आहे. सदर जागेचे मूल्यांकन करण्यासाठी भूमि जिंदगी विभागाला मागणी केली आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, शगुन चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने फुल बाजारासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करण्याची आवश्यकता होती. या फुल मार्केटमध्ये शेतकरी आपला माल विक्रीसाठी घेवून येतात.
तसेच शहरातील नागरिक फुल खरेदीकरीता याठिकाणी गर्दी करतात. वाढत्या व्यापारामुळे जागा अपुरी पडत होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड फुल व्यापारी संघ आणि कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून अतिरिक्त जागा मिळणेबाबत मागणी करण्यात आली होती.
याबाबत प्रशासन सकारात्मक असून, जागा हस्तांतरणासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे.