पुणे : लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने देशातील जनतेला 10 गॅरंटी दिल्या आहेत. तसेच जनतेने आम आदमी पक्षाला केंद्रात निवडून दिल्यास देशाचा विकास 10 वेगवेगळ्या मार्गांनी होईल असा दावाही केला आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत नागरिकांना 10 मोठी आश्वासने दिली आहेत. देशातील गरीब जनतेला मोफत वीज देण्याची घोषणा याशिवाय शेतकरी, विद्यार्थी, आरोग्य, रोजगार, भ्रष्टाचारसंबंधित 10 आश्वासने अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.
या आहेत अरविंद केजरीवाल यांच्या 10 गॅरंटी
1) प्रत्येक गावात आणि परिसरात दर्जेदार शाळा सुरु करणार. प्रत्येक मुलाला उत्तम आणि मोफत शिक्षण मिळण्याची व्यवस्था करणार.
2) गरीब आणि श्रीमंत दोघांसाठी उपचार मोफत असतील. उपचाराचा दर्जा जागतिक दर्जाचा असेल. जो काही खर्च असेल तो सरकार उचलेल.
3) देशात 24 तास वीजेची व्यवस्था करणार. कुठेही लोड शेडिंग होणार नाही. गरीबांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत देणार.
4) अग्निवीर योजन बंद करुन जुन्या पद्धतीनुसार सैन्य भरती केली जाणार. भरती झालेल्या अग्निवीरांना कायमस्वरुपी सैन्यात घेतलं जाणार.
5) चीनने कब्जा केलेली जमीन पुन्हा भारतात आणणार. लष्कराला योग्य पावले उचलण्यासाठी सर्व सूट देणार.
6) केंद्रात सरकार स्थापन झाल्यास दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
7) जर जनतेने आप ला केंद्रात निवडून आणलं तर आम आदमी पार्टी स्वामिनाथ अहवाल लागू करेल आणि त्यानुसार शेतक-यांना एमएसपी मूल्य दिले जाईल. याचा शेतक-यांना फायदा होणार आहे.
8) भाजपची वॉशिंग मशीन बंद करणार. भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण आणि इमानदारांना जेल ही पद्धत बंद करणार.
9) भारत सरकार देशातील उद्योगपतींना मदत करेल. आपल्या देशातील अनेक मोठे उद्योगपती आपले व्यवसाय बंद करुन परदेशात गेले आहेत, यामुळे देशाचे नुकसान होत आहे. देशामध्ये ज्याला व्यवसाय करायचा आहे तो करु शकतो.
10) वर्षभरात दोन कोटी रोजगार निर्माण होतील. सर्व तरुणांना सरकारी नोक-यांसाठी तयार केले जाईल. रिक्त जागा सोडल्या जातील आणि परीक्षा निष्पक्षपणे घेतल्या जातील.