सागर जगदाळे
भिगवण : तक्रारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सहल जाणार आहे. शालेय सहलीसाठी या विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करणे आवश्यक होते. यासाठी तक्रारवाडी शाळेचे मुख्याध्यापक राजेश नाचण व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज वांझखडे यांनी रक्तगट तपासणी करून देण्यासाठी सामाजिक संस्थांना आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व लॅबोरेटरी यांच्या वतीने शाळेतील तात्काळ दीडशे विध्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करून देण्यात आली.
रक्तगट तपासणीवेळी लाईफलाईन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर संजय भोसले व लॅबोरेटरी विभागाचे प्रमुख डॉक्टर स्वप्नील माळवदकर यांनी स्वतः उपस्थित राहून ही तपासणी वेळेत पूर्ण करून दिली. त्यामुळे शालेय सहलीसाठी जाणाऱ्या विध्यार्थ्यांना कोणतीच अडचण राहिली नाही.
सदर कार्यक्रमावेळी मोफत रक्तगट तपासणी करून दिल्याबद्दल लाईफलाईन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.संजय भोसले, लॅबोरेटरीच्या विभागाचे प्रमुख डॉ. स्वप्नील माळवदकर व आरोग्यसेवक केतन राजेंद्र वाघ यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज वांझखडे, मुख्याध्यापक राजेश नाचण व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.