पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड परिसरातील पिंपळे निलख येथील एका महिलेची शेअर मार्केट आणि इतर फायनान्सियल सेवा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मोतीलाल ओसवाल कंपनीच्या नावाने तब्बल साडेचार लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना १२ जानेवारी ते १४ एप्रिल या कालावधीत घडली. शेअर खरेदी करण्याच्या बहाण्याने पैसे घेतले. त्यानंतर संपर्क बंद करून महिलेची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका व्यक्तीवर सांगावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद गायकवाड (रा. ठाणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद हा मोतीलाल ओसवाल फायनान्सियल लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सदर महिलेला सांगितले. महिलेशी वर्षभर बोलणी करून त्यांचा विश्वास संपादन केला. कंपनीचे अनलिस्टेड ६ हजार ३६० शेअर्स ५ लाख रुपयांना विकत घेण्यास सांगितले.
महिलेने ते शेअर खरेदी करण्यासाठी तयारी दर्शवली असता प्रमोद याने मोरेश्वर कार्पोरेशन कंपनीच्या खात्यावर पैसे घेतले. त्यानंतर महिलेला कोणतेही शेअर दिले नाहीत. त्यामुळे महिलेने आपण तक्रार करणार असल्याचे सांगितले असता प्रमोद याने महिलेला ५० हजार रुपये दिले. उर्वरित साडेचार लाख रुपये न देता महिलेची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.