अमिन मुलाणी
शिरूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडे असणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर इचकेवाडी येथे गुरुवार दुपारी १२ च्या सुमारास चारचाकी व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ठार तर एक जखमी झाला आहे. टाकळी हाजी पोलीस दुरुक्षेत्राचे पोलीस जमादार देविदास खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद राजकारण यादव (वय ३२), लाला धरमपाल यादव (वय २५) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. लालमल चुक्कीमल यादव हा एकजण गंभीर जखमी झाला आहे. (हे सर्व रा.शिव, ता. बभेरु, जि. बांदा, उत्तर प्रदेश)
दुपारी साडेबाराच्या सुमारास अष्टविनायक महामार्गावरून ३ जण दुचाकीवरून कवठे येमाई बाजूकडे चाललेले असताना इचकेवाडी जवळ खार ओढ्याच्या वळणावर समोरून आलेल्या चारचाकी वाहन व दुचाकीची जोरात धडक झाली. या अपघातात २ जण ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजीचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमीला पुढील उपचारासाठी व ठार झालेल्या दोघांना शवविच्छेदनासाठी तात्काळ शिरूर येथे हलविण्यात आले आहे.
सुपर कॅरी गाडी (नं MH 14 kQ 4017) व हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटर सायकल (नंबर MH 14 JQ 8931) यांचा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त दोन्ही वाहने टाकळी हाजी दूरक्षेत्र या ठिकाणी लावण्यात आली आहेत, अशी माहिती खेडकर यांनी दिली. दरम्यान, अष्टविनायक महामार्ग वेगवान झाल्याने तसेच रस्त्यावरील वर्दळ वाढल्याने इचकेवाडी जवळील खार ओढ्या जवळच्या वळणावर येणारी-जाणारी वाहने अतिशय वेगात जात असल्याने, अपघातास निमंत्रण मिळत आहे. ओढ्याच्या दोन्ही बाजूस तात्काळ गतिरोधक तयार करण्याची मागणी ग्रामस्थ व प्रवाशांतकडून केली जात आहे.