बीड : बीडचे नवीन पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी बीड पोलिस दलातील वादग्रस्त ठरलेल्या ४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली. ते. केज पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.
आता पोलिस निरीक्षक वैभव पाटील हे केज पोलिस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पोलिस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलिस स्टेशनचा पदभार घेणार आहेत, तर पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलिस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली. पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ही मोहीम राबवली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात असून देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने कर्तव्यात कुचराई केल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. यानंतर गावकऱ्यांकडून पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करत बीड पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली.
वादग्रस्त पोस्टनंतर सपोनि मुंडेंची बदली
मी जर प्रेस घेतली, तर बीडच्या खासदाराची चड्डी राहणार नाही असे म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली असून गणेश मुंडे असे बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. खासदार बजरंग सोनवणेंनी आवाज उठवल्यानंतर अखेर वादग्रस्त पोलिस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली पुणे येथील नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.