धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्री दोन गटामध्ये झालेल्या तुफान हाणामारीमध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेतातील पाण्यावरून दोन गटामध्ये वाद झाला. धाराशिवमधील वाशी तालुक्यातील बावी पिडी येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी येथील येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून येरमाळा पोलिसांनी 10 आरोपींना संशियत म्हणून ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. केवळ शेतामधील पाणी हेच वादाचे कारण आहे की दुसरं काही, याचा शोध घेण्याचे काम पोलिस करत आहेत.