खेड : खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे लांडग्यांच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार झाल्या तर चार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. ६) पहाटेच्या सुमारास घडली आहे. वन विभागाने लांडग्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खरपुडी परिसरात लांडग्याचा उपद्रव वाढला आहे.
सोमवारी पहाटे खरपुडी दत्तनगर येथील शेतकरी उत्तम प्रभाकर काशिद यांच्या गोठ्यातील शेळ्यावर अशाच प्रकारे हल्ला झाला. या हल्ल्यात चार शेळ्या ठार झाल्या. तर चार शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. यामुळे काशिद यांचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी वन विभागाचे वनक्षेत्रपाल गुलाब मुरकुटे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
खरपुडी गावालगत दोन्ही बाजुला डोंगर असुन त्यावर दाट झाडी आहे. या परिसरात कोल्हे, लांडगे, तरस यांचा वावर आहे. डोंगर भागात खाद्याची व पाण्याची कमतरता भासू लागल्याने लांडग्याचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. साधारणपणे आठ ते दहा लांडग्यांची टोळी परिसरात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. लांडग्यांमुळे पाळीव प्राण्यांबरोबरच मानवी जीवनालाही धोका निमार्ण झाला आहे. लांडग्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी बाजार समितीचे संचालक व खरपुडीचे सरपंच जयसिंग भोगाडे यांनी केली आहे