पुणे : ‘रसना’ चे या प्रसिद्ध ब्रँडचे संस्थापक अरिज पिरोजशॉ खंबाटा (वय-८५) यांचे शनिवारी (ता.१९) निधन झाले आहे. रसना ग्रुपच्यावतीने सोमवारी (ता.२१) प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.
पिरोजशॉ खंबाटा हे बेनेव्होलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्षही होते. तसेच ते वर्ल्ड अलायन्स ऑफ पारसी इराणी जरथोस्तीचे माजी अध्यक्ष आणि अहमदाबाद पारसी पंचायतीचे अध्यक्षही राहिले होते.
त्यांच्या निधनाची माहिती रसना ग्रुपच्यावतीने देण्यात आली आहे. तसेच “भारतीय उद्योग, व्यापार आणि सामाजिक विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले,” असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, रसना ही आता जगातील सर्वात मोठ्या शीतपेय उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. खंबाटा यांनी १९७० च्या दशकात ‘रसना’ या घरगुती शीतपेयाची निर्मिती केली होती.
अल्पावधीच हे शीतपेय लोकप्रिय झाले होते. आज देशभरातील १८ लाख रिटेल दुकांनांसह जगभरातील ६० देशांमध्येही रसनाची विक्री केली जाते.