लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थेऊर फाटा (कुंजीरवाडी, ता. हवेली) येथील बस स्थानकाजवळ माजी सरपंच सचिन तुपे (Sachin Tupe) यांना सोन्याचं मंगळसूत्र व पैसे असलेले पाकीट सोमवारी (ता.२९) सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सापडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सचिन तुपे हे बँक ऑफ महाराष्ट्राकडून थेऊर फाट्याकडे पायी चालले होते. नवनाथ रसवंती गृहाच्या समोरून जात असताना, पुणे सोलापूर महामार्गावर त्यांच्या पायाला अचानक जड पाकीट लागले. त्यांनी तात्काळ पाकीट उचलले. आणि आत उघडून पाहिले असता त्याच्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र व काही रक्कम आढळून आली.
या पाकिटावर नंदराज ज्वेलर्स हडपसर असे नाव आहे. त्यामध्ये वाट्यांचे मनी मंगळसुत्र आहे. त्याच बरोबर काही रक्कम व अजून काही वस्तू आहेत. ज्यांचे हे पाकीट असेल त्यांनी त्वरित ९८२२४५७६९६ या क्रमांकावर संपर्क करावा. व आपल्या पाकिटाची ओळख पटवून घेऊन जावे असे आवाहन माजी सरपंच सचिन तुपे यांनी केले आहे.
दरम्यान, जगात प्रामाणिकपणा कुठे आहे, असे सहज बोललं जात, पण प्रामाणिकपणा आहे. हेच कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.