पुणे: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जिल्ह्यात जोरात सुरु झाली आहे. बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्यासह देशाचे लक्ष आहे. या मतदारसंघात सर्वच उमेदवार आपण केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहेत. त्यानुसार शिरूरमध्ये विद्यमान खासदार आपण केलेल्या कामांची माहिती लोकांना देत आहेत. यामध्ये इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पाचाही समावेश आहे. आता नेमकं यावरूनच विरोधकांनी अमोल कोल्हेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. चाकण येथील मेदनकरवाडीच्या माजी सरपंच प्रियांका मेदनकर-चौधरी यांनी अमोल कोल्हेंवर इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पाचे बिनकामाचे श्रेय घेत असल्याचा आरोप केला आहे. त्याबाबत त्यांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहली आहे.
या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ”प्रथमतः आपल्याला सप्रेम नमस्कार. मागील पाऊणे पाच वर्षे आपले दर्शन कमी झाल्याने आपल्या माहितीकरिता हा आजचा डिजिटल पत्रव्यवहार. मी ग्रामपंचायत मेदनकरवाडी गावची सरपंच असताना आपल्या देशाचे मा. पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्याशी २४ एप्रिल २०२० रोजी माझा पंचायतराज दिनाच्या निम्मिताने गावची सरपंच म्हणून संवाद झाला. सदर कार्यक्रमानंतर माझ्या मेदनकरवाडी गावाला अनेक ठिकाणी खूप चांगली प्रसिद्धी मिळाली आणि कामाचे कौतुक देखील झाले”.
”आपल्या गावातील आणि परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असा काहीतरी मोठा प्रोजेक्ट झाला पाहिजे यासाठी अभ्यास केला. काही दिवसानंतर आम्ही शिष्टमंडळ घेऊन ५ मे २०२० रोजी तत्कालीन जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मा. आयुष प्रसाद सर यांची भेट घेतली. आमच्या मेदनकरवाडी गावाला लागून सुमारे (५००-५५०) वनविभागाची जमीन होती. सदर भागातील काही जमीन पडीक आहे. त्यातील गावाजवळच्या काही जागेवर कोणतेही जंगल/वने नाहीत. त्या जागेचा प्रस्ताव मांडून त्यावर काही प्रोजेक्ट करता येईल, यासाठी आम्ही जिल्हा परिषदमध्ये प्रेझेंटेशन दिले. विविध विषयांवर चर्चा झाल्यावर, इंडस्ट्रीअल पार्कपासून ते रिसर्च सेंटर अशा विविध विषयांबाबत चर्चा होऊन अंतिमतः महाराष्ट्रात कुठेही नसलेल्या मेडिसिटीबाबत सर्वांचे एकमत झाले. यात विविध स्पेशालिटी हॉस्पिटल्स, मेडिकल कॉलेज, रिसर्च सेन्टर अशा गोष्टी समाविष्ट करून एक अत्याधुनिक मेडिकल पार्क म्हणजेच #इंद्रायणी_मेडिसिटी उभारण्याचे ठरले.
#इंद्रायणी_मेडिसिटीबाबत प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाले. यासंदर्भातील त्याची रचना, स्वरूप आणि जागेची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य समिती सदस्य डॉक्टर हेम सर व प्रसिद्ध कॅन्सर बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय अंदर सर यांनी मेदनकरवाडी गावाला भेट देऊन आमच्यासोबत जागेची पाहणी केली. जागाही सर्वांना योग्य वाटली त्याबाबत तसा सविस्तर अहवाल देखील त्यांनी कळवला.
अहवाल दाखल झाल्यानंतर पुढील १-२ बैठकांना आपण स्वतः उपस्थित न राहता तुमचे स्वयंघोषित बंधू प्रतिनिधी उपस्थित राहिले (मा. खासदार अमोल कोल्हे का येत नव्हते, हे सगळा मतदारसंघ मागील पाऊणे पाच वर्ष जाणतोच आहे) होते. पुढील काही दिवसांनी आमचा प्रोजेक्ट आपण स्वतःचा प्रोजेक्ट तयार केला, असे भासवून राज्य शासनापुढे मांडला. त्यानंतर दिखावा करण्यासाठी विविध जागा बदलण्यात आल्या. पुढे राज्य शासनकडून निधी मंजूर झाला, असे सांगण्यात आले. परंतु, पुढे कसलीही कार्यवाही देखील झाली नाही. कारण खासदार साहेब आपणाला नाटके आणि चित्रपट यातून वेळ कुठे होता.
कोरोनानंतर सामान्य जनतेला असलेली आरोग्याची गरज पाहून सुद्धा ऑगस्ट २०२३ पर्यंत मेडिसिटी प्रोजेक्ट पूर्ण करणे अपेक्षित होते. कारण वैद्यकीय व्यवस्थेची नितांत गरज पुणे तथा संपूर्ण महाराष्ट्र राज्याला होती. पण तरीही स्वतः पेशाने डॉक्टर असून सुद्धा आपल्याला महत्त्व वाटले नाही? गेल्या पाऊणे पाच वर्षात मा. खासदार म्हणून आपल्या अकार्यक्षमतेमुळे हा मेडिसिटी प्रोजेक्ट फक्त कागदावरच राहिला.
;
नुकताच दुसऱ्याचे श्रेय लाटणारा खासदार म्हणून आपली ओळख असलेला कार्य अहवाल पाहिला आणि आपण निवडणूक जाहीरनाम्यात उल्लेख करताना #इंद्रायणी_मेडिसिटीसाठी किती प्रयत्न केले? कुठे कुठे पाठपुरावा केला? याचा फक्त जाहीरमान्यात उल्लेख करताना ३०० कोटी मंजूर सांगता. त्याच्यावर कसलीच ठोस पावले उचलली गेली नाही यांची खंत आम्हाला नक्कीच आहे.
मतदारसंघात कुठेतरी आमचा प्रोजेक्ट चोरून तो किमान चालू जरी झाला असता तरी आम्हाला आनंदच झाला असता. पण असो तुम्हाला दुसऱ्याचे श्रेय लाटणारा खासदार अशी ओळख टिकवायची असेल. असो तुमच्या लुटीच्या धोरणाचा निषेध..” असं देखील प्रियांका मेदनकर-चौधरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.