दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दिल्लीच्या एम्स रूग्णालयात निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांना 8 वाजताच्या सुमारास एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मनमोहन सिंग यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते.
संध्याकाळच्या सुमारास त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दिल्ली मध्ये एम्स रूग्णालयात आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी द्विट करत या घटनेची माहिती दिली.
राहुल गांधीं बेळगावहून दिल्लीला रवाना
दरम्यान, मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच काँग्रेस नेते राहुल गांधी हे बेळगावहून दिल्लीला रवाना झाले आहेत. मल्लिकार्जुन खरगे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. याशिवाय काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते देखील दिल्लीकडे निघाले असल्याची माहिती मिळत आहे. बेळगावमधील उद्या होणार असलेली रॅली देखील रद्द करण्यात आली आहे. सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.