दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काँग्रेस मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
काँग्रेस मुख्यालयात पार्थिव दाखल…
माजी पंतप्रधान दिवंगत डॉक्टर मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात असलेले मंत्री देखील काँग्रेस मुख्यालयात आलेले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांसह सामान्य नागरीक या ठिकाणी डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊ शकणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास निगमबोध घाट स्मशानभूमीत दाखल होईल. त्यानंतर अंत्यसंस्कार सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास पार पडेल.
डॉ. सिंग यांच्या समाधीसाठी जागा देण्याची मागणी…
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी जागा देण्याची मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे. मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावर निगम बोध घाट इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. सरकारच्या या निर्णयानं कॉंग्रेस पक्ष नाराज असल्याची माहिती आहे. माजी पंतप्रधानांच्या पार्थिवावर राजघाट येथे अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, डॉ. सिंग यांच्यासाठी निगम बोध घाट इथे जागा देण्यात आल्याने काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.