पुणे : पुण्यातील सिंहगड पायथा येथे फिरायला गेलेले शासकीय ठेकेदार आणि डोणजे गावचे माजी उपसरपंच विठ्ठल पोळेकर यांची नोव्हेंबर महिन्यात हत्या करण्यात आली होती. विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण केल्यानंतर तासाभरात आरोपींनी त्यांचा खून केला, त्यानंतर आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून खडकवासला धरणात टाकून दिले होते. या हत्या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली होती, आता मुख्य आरोपीला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे.
19 नोव्हेंबर 2024 ला सिंहगड पायथ्याजवळील डोणजे गावात विठ्ठल सखाराम पोळेकर फिरायला गेले होते. बराच वेळ विठ्ठल पोळेकर घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोळेकर यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं, पण या हत्येचं कारण आता समोर आलं आहे.
खून करण्यामागचं धक्कादायक कारण उघड
या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी योगेश भामेने याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. शासकीय ठेकेदार पोळेकर यांनी पायगुडेवाडी ते गोळेवाडी रस्त्याच्या कामाचा ठेका घेतला होता. या कामात अडथळा आणण्याची धमकी देऊन मुख्य आरोपी योगेश भामने याने पोळेकर यांच्याकडे महागडी मोटार आणि दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पोळेकर यांनी खंडणी आणि महागडी मोटार द्यायला नकार दिल्याने ही हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.