मुंबई : सर्वत्र हिवाळ्याचा थंडावा जाणवत असून हिवाळ्यात दाट धुक्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवांसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना देखील विलंबाचा फटका बसल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्याच्या वेळापत्रकावर मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, मुंबईत येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या काही मिनिटे उशिराने दाखल होत असल्याने त्याच्या परिणाम उपनगरीय लोकलवर दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात थंडीचे प्रमाण वाढले असून दाट धुक्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीला सतत फटका बसत आहे. तसेच पहाटे खंडाळा आणि कसारा घाटातील धुक्यामुळे अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेगावर मर्यादा येत आहे. परिणामी, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षाही विलंबाने धावत आहेत. दिल्ली आणि उत्तर भारतातून मुंबईत येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसचा वेग दाट धुक्यामुळे मंदावला आहे. परिणामी, त्याचा परिणाम मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर होत आहे.
अनेक मेल-एक्स्प्रेस पहाटे आणि सकाळच्या वेळी मुंबईत दाखल होतात. मात्र, आपल्या निर्धारित वेळेपेक्षा गाड्या विलंबाने येत असल्याने लोकल सेवेवरही परिणाम होत आहे. लोकलसेवा देखील १०-१५ मिनिटे उशिराने धावत आहेत. अशातच मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक सुधारण्यासाठी या गाड्या उपनगरीय लोकल मार्गावर वळवण्यात येतात. त्यामुळे अप जलद मार्गावरील लोकलवर परिणाम होत आहे. दाट धुके असल्याने मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या लोको पायलटना रूळ, सिग्नल दिसण्यास अडचणी येतात.
हवेतील दृश्यमानता कमी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मेल-एक्स्प्रेस-लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत. परिणामी, मेल-एक्स्प्रेस हळूहळू चालवण्यात येतात. त्यामुळे मुंबई येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळापेक्षा उशिराने येत असल्याने लोकल सेवा देखील विलंबाने धावत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून मध्य रेल्वेवर गाड्या १२-१५ मिनिटे, तर पश्चिम रेल्वेवर गाड्या ८-१० मिनिटे विलंबाने धावत आहेत. परिणामी, लोकलमध्ये आणि स्थानकात गर्दी दिसून येत आहे.