सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्यातलं मारकडवाडी हे गाव खूप चर्चेत आलं आहे. या गावानं २९ नोव्हेंबरपासून ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. गावात ईव्हीएम ऐवजी बॅलेटपेपरवर फेरमतदान घेण्यात यावं, अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीनंतर हे गाव देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलं. रविवारी (८ डिसेंबर) शरद पवारांनी देखील या गावाला भेट दिली. यावेळी झालेल्या भाषणातून पवारांनी निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित करत, निवडणूक पद्धतीत बदल करण्याची मागणी केली आहे.
शरद पवारांची सभा होण्यापूर्वी सभास्थळी भाजप आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पहायला मिळालं. यात पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना धमकावल्याचा दावा केला गेला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून त्यांनी शरद पवार गटाचे रणजीत मोहिते पाटील आणि माळशिरसचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्यावर निशाणा साधला. दिवा विझायच्या आधी फडफड करत असतो, अशा शब्दात सातपुते यांनी रणजीत मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्यावर टीका केली आहे.
रणजीत मोहिते पाटलांचे आणि उत्तम जानकर चे पाळीव गुंड मारकडवाडीतील ग्रामस्थांना अशा भाषेत धमक्या देत आहेत .
मारकडवाडी गाव भाजपा च आहे आणि राहील.
दिवा विझायच्या आधी फडफड करत असतो . @Dev_Fadnavis @cbawankule @AmitShah #Markadwadi pic.twitter.com/dacNKjhJRC— Ram Satpute (@RamVSatpute) December 8, 2024
नेमकं काय म्हणाले राम सातपुते?
सातपुते यांनी एक्स खात्यावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “रणजीत मोहिते पाटलांचे आणि उत्तम जानकरचे पाळीव गुंड मारकडवाडीतील ग्रामस्थांना अशा भाषेत धमक्या देत आहेत. मारकडवाडी गाव भाजपचं आहे आणि राहील. दिवा विझायच्या आधी फडफड करत असतो.”
राम सातपुते यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं बघायला मिळत आहे. व्हिडीओबाबत केलेल्या दाव्यानुसार, शरद पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपने लावलेल्या बॅनरच्या जागी शरद पवार गटाचा बॅनर लावला होता. यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा शरद पवार गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं बघायला मिळालं. या व्हिडीओवरून राम सातपुते यांनी रणजीत मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.