दौंड : पुण्यात चोरांनी उच्छाद मांडला असून विविध भागामध्ये चोरीचे सत्र सुरुच आहेत. अशातच दौंड तालुक्यातील पाटस स्टेशन परिसरात शिरुर तालुक्यात दरोडा घालण्याच्या तयारीत आलेल्या पाच संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले आहे. यावेळी एक चोर हाती लागला आहे तर इतर चारजण पसार झाले आहेत. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धू रसिकलाल चव्हाण, दीपक रसिकलाल चव्हाण (दोघेही राहणार इनामगाव, ता. शिरुर जि. पुणे), प्रशांत फोट्या उर्फ बंडू काळे, हनुमंत फोट्या उर्फ बंडू काळे (दोघेही रा. राक्षसवाडी ता.कर्जत जि. अहमदनगर), बाबुशा गुलाब काळे (रा. शेडगाव ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी संशयित चोरांची नावे आहेत.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पाटस कानगाव रोडवरील पाटस रेल्वे स्टेशन परिसरात शनिवारी (दि.04) रात्री साडेनऊच्या सुमारास दोन मीटर सायकलीवर पाचजण धारदार हत्यारे आणि मिरची पूड घेऊन रेल्वे रुळाच्या कडेला झाडाझुडपामध्ये लपून बसले होते. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांना त्यांच्या हालचालीवरुन त्या चोरट्यांवर संशय आला. ग्रामस्थांना पाहताच चोर तेथून पसार झाले. चोर पळून जात असल्याचे पाहून ग्रामस्थांना त्या चोरांवरील संशय वाढला आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एक चोर हाती लागला तर बाकीचे चार चोर अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळ काढले. त्या संशयित चोरांकडे कु-हाड, लोखंडी कोयता आणि मिरची पावडरची पुडी असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी ग्रामस्थांनी पोलीसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यावेळी सिद्धू रसिकलाल चव्हाण यास ग्रामस्थांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलीस हवालदार कानिफनाथ पानसरे यांनी फिर्याद दिल्याने पाच चोरांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.