नाशिक : मालेगाव पोलीस ठाणे हद्दीतील दरेगाव शिवारात इसाक बिन यासीन मशीदजवळ एका नायलॉनच्या पिशवीत स्कार्फमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत पाच दिवसांचे बाळ सापडले. या बालिकेस मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता बालकल्याण समिती, नाशिक यांच्या आदेशान्वये या बालिकेस ‘परी’ नाव देऊन नाशिकच्या आधाराश्रमात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत बालगृहामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके दाखल केली जातात. बालकाची ओळख पटवून संपर्क साधाण्याचे आवाहन, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी केले आहे. बालकाच्या भविष्याचा विचार करता परी हिच्या पालकांनी आधाराश्रम संस्था, घारपुरे घाट, नाशिक येथे अथवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक, समाजकल्याण आवार, नाशिक या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती प्रसारणाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत बालकाचा दावा करण्यास कोणी आले नाही, तर बालकाला पालक नसल्याचे गृहीत धरून पुढील पुनर्वसनाचा विचार करण्यात येणार असल्याचेही दुसाने यांनी सांगितले.