पुणे : क्रांतीचे बीजारोपण करणारे आद्य क्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे यांची आज सोमवारी (ता.१४) २२८ वी जयंती आहे. त्यांची जयंतीनिमित्त महाराष्ट्रात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात. त्यांच्या प्रतिमेच्या समोर नतमस्तक होऊन अभिवादन करतात.
क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ – १७ फेब्रुवारी १८८१) हे स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावच्या ‘नारायण पेठ’ मध्ये पूर्वीच्या मांगवाड्यात एका मातंग कुटुंबात झाला.
मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते.
लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नव्हते. वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते.
एकदा राघोजी साळवे यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर करताना आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे सोपवली होती.
पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत ‘ या पदवीने गौरविले होते.
दरम्यान, ५ नोव्हेंबर १८१७ साली पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व २३ वर्षे वयाच्या लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. लहुजींचे वडील राघोजी साळवे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे शत्रूवर तुटून पडत व सपासप तलवारीचे वार करताना शत्रुंना जमिनीवर लोळवत होते.
अखेर या संकटातुन बाहेर पडण्यासाठी घाबरलेल्या इंग्रजांनी एकत्र वार करून राघोजींना संपवले. राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८ मध्ये मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज शनिवार वाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.
या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले.
आपल्या वडिलांना आपल्या डोळ्यासमोरच शहीद झालेले पाहून लहूजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली व भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली. ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगरजवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे.
लहूजी साळवे यांनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले.
त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले.
यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.
दरम्यान, २० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला.
अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे
लहुजी साळवे यांचे कार्य शिक्षणांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. सावित्रीबाई फुले यांना उच्च वर्गातील माणसे त्रास देत होती तेव्हा लहुजी साळवे हे सावित्रीबाई व जोतिबा फुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा इ.स. १८४८ साली भरत होती. आद्य क्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याला आणि पराक्रमाला पुणे प्राईम न्यूजचा मनाचा सलाम!