सुरेश घाडगे
परंडा : परंडा तालुक्यातून जाणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवे संदर्भातील पहिली अधिग्रहण परिषद व लाक्षणिक उपोषण सोमवारी ( दि. ८) तालुक्यातील रोहकल येथे होणार आहे. मावेजासाठीच्या अदोलनाचा एक भाग म्हणून रोहकल येथील रोहकलेशवर महादेव मंदिरासमोर हे उपोषण होत आहे .
चेन्नई सुरत ग्रीन फील्ड हायवे हा देशाच्या महत्त्वाच्या सहा राज्यातून जातो. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून १२७१ किलोमीटरचा बहुचर्चित हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रीनफिल्ड हायवे आहे. परंडा तालुक्यातील २१ गावांच्या शेत शिवार -परिसरातून हा मार्ग जात आहे .चेन्नई सुरत हायवे मध्ये जाणाऱ्या शेतीस खूपच कमी मावेज मिळणार आहे.
चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवे मध्ये जाणाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनी याचा प्रामुख्याने विचार केला असता, मागील तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी रेडी रेकनर (सरकारी किंमत ) प्रमाणे खरेदी केलेली असल्यामुळे त्या गावांमध्ये आऊट ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेल्या खरेदी खताची नोंद कुठेही रेकॉर्डवर ती येणार नाही . त्यामुळे रेडी रेकनर च्या किंवा मागील तीन वर्षात जास्तीत जास्त किमतीने नोंदवलेल्या दस्ताच्या किमतीला गुणिले चार करून शेतकऱ्याला मावेजा मिळणार आहे.
सरासरी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व अहमदनगरचा काही भाग याचा विचार केला असता, ९९ टक्के हा रस्ता ग्रामीण भागातून जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी बहुतांश वेळी खरेदी खताचे व्यवहार हे रेडी रेकनर च्या अधीन राहून केलेले आहेत . त्यामुळे याच मुद्द्याच्या आधारे साधारण दोन लाख ते पाच लाख रुपये या किमतीमध्ये दस्त झालेले आहेत. जिराईत जमिन दस्त दोन लाख रुपये तर बागायताचा दस्त पाच लाख रुपये किंवा जवळपास या किमतीने झालेला आहे.
त्यामुळे सदर रकमेला अधीन राहून चेन्नई सुरत हायवे मधील मिळणारा मावेजा अपेक्षित जिरायतासाठी आठ लाख रुपये किंवा फार तर बारा लाख रुपयापर्यंत मिळू शकतो. तर बागायत जमिनीची यापेक्षा दुप्पट रक्कम मिळण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी याच्यापेक्षा अधिक पट रकमेचे बाजार मुल्य आहे. मात्र शेतकऱ्यांना सुरत चेन्नई हायवे मध्ये जाणाऱ्या जमिनीचा मावेजा कमी मिळणार असल्याचे अधिग्रहण परिषदेतील शेतकऱ्यांनी सांगितले .
भूसंपादन ऑफिस येथे याबाबतची कुठल्याही स्वरूपाची लिखित अशी माहिती नसल्यामुळे याभागातील शेतकरी संभ्रमात आहेत. अदोलनसाठी डॉ. मनोज मुनोत, बाळासाहेब जाधव, अॅड. प्रकाश गुंड, माणीकराव पाटील ( कव्हे ता. बार्शी), भाजपाचे जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, प्रा. घनश्याम गिलचे, शिवाजी पवार आदीसह उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर येथील शेतकरी या अंदोलनासाठीं उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, परंडा तालुक्यातील हिंगणगांव (बु.),कांदलगाव, सिरसाव, घारगाव, जवळा ( नि . ), आरणगाव, टाकळी, कुंभेफळ, जाकेपिंपरी,पिस्तमवाडी, साकत ( बु ), रोहकल, राजूरी, वाडीराजूरी , आनाळा, रत्नापुर, मलकापुर, पांढरेवाडी, उंडेगाव, चिंचपूर (बु.), चिंचपुर ( खु . ) आदि २१ गावांच्या – शेत शिवारातून चेन्नई सुरत ग्रीन फील्ड हायवे हा मार्ग जात आहे.