पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेजारी-शेजारी राहत असलेल्या दोन भावांमध्ये जागेवरुन झालेल्या वादातून चुलत भावाने चारचाकी वाहनाने भावाला धडक दिली. त्यानंतर त्याने बोनेटला पकडलेल्या स्थितीत भावाला जवळपास तीनशे ते पाचशे मीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. राजेंद्र नाथु थिटे असे जखमी झालेल्या भावाचे नाव आहे.
या प्रकरणी राजेंद्र नाथु थिटे (वय-४६, रा. शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. विनायक सदाशिव थिटे, वैशाली विनायक थिटे, गणेश सदाशिव थिटे, सारीका गणेश थिटे, अमित सदाशिव थिटे, कोमल अमित थिटे, सदाशिव बुधाजी थिटे, मधुरा गणेश थिटे, अथर्व विनायक थिटे (सर्व रा. थिटेआळी, केंदूर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र यांची केंदूर येथे वडिलोपार्जित जमीन आहे. फिर्यादी यांच्या वाट्याला आलेल्या जमिनीमध्ये त्यांचे जुने घर होते. ८ ते ९ महिन्यापूर्वी जुने घर पाडून नवीन घर बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यांनी वीजेचे मीटर त्यांच्या वाटणीमधील जांभळाच्या झाडाला लावले होते. त्याचा चुलत भाऊ विनायक याने त्या मीटरजवळ त्याचा मीटर दिसून नये, असा पत्रा लावला होता.
१ नोव्हेबर रोजी फिर्यादी आपल्या कुटुंबियांसोबत नवीन बांधकाम पाहण्यासाठी गावी गेले. फिर्यादीच्या मीटरला खेटून पत्रा लावल्यामुळे मीटर दुसरीकडे लावण्यासाठी गेले. त्यावेळी मीटरला लागून असलेल्या पत्र्याला त्यांचा धक्का लागला. म्हणून चुलत भाऊ विनायक आणि त्याच्या घरातील सर्व जण आरडाओरडा करत फिर्यादी यांच्याकडे धावत आले. राजेंद्र म्हणाले कि ही जागा आमची आहे़, असे म्हणत तुम्ही पत्रा का हलवला.
दरम्यान, फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागले. तेव्हा त्यांची पत्नी अनिता राजेंद्र यांना वाचवायला मध्ये पडली असता तिलाही मारहाण करण्यात आली. फिर्यादीचा मुलगा आकाश यालाही मारहाण केली. फिर्यादीची मुलगी प्रतिमा हे सर्व मोबाईलवर व्हिडिओ शुटिंग केले. ते पाहून विनायक थिटे याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत त्यांना दगडे फेकून मारली.
त्यानंतर त्याने गाडीने ठोस दिल्यानंतर फिर्यादी गाडीचे बोनेटवर पडले. तेव्हा त्यांनी बोनेटला धरुन ठेवले. तरीही विनायकने फिर्यादी बोनेटवर पडले असतानाही गाडी तशीच ३०० ते ५०० मीटर चालवित नेली. या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिक्रापूरमधील साई अॅक्सिडेट हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हवालदार मळेकर तपास करीत आहे.