पुणे : एस. एम. जोशी पुलाखाली नदीत पडलेल्या कारमधील ५ जणांना अग्निशामक दलाच्या जवानांना वाचविण्यात आज शुक्रवारी (ता.१२) यश आले आहे.
वंचिका लालवाणी (वय-१३), प्रिया लालवाणी (वय-२२, कुणाल लालवाणी (वय-२८), कपिल लालवाणी (वय-२१) आणि कृष्णा लालवाणी (वय-८, सर्व रा. पालघर) वाचविण्यात आलेल्या ५ जणांची नावे आहेत,
मिळालेल्या माहितीनुसार, एस. एम. जोशी पुलावरून लालवाणी कुटुंब चारचाकी गाडीतून चालले होते. गुरुवारी मध्यरात्री नदीपात्रालगत असलेल्या रस्त्यावरून जाताना वाहन चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने एक चारचाकी पाण्यात वाहून गेली. आणि थोड्या अंतरावत गाडी नदीपात्रात अडकली. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कुटुंबाला गाडीच्या बाहेर निघता आले नाही. आणि कुटुंब नदीत अडकून बसले.
गरवारे कॉलेजजवळील एस. एम. जोशी पुलाखाली नदीत एक कार तरंगत असल्याचा फोन अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला मध्यरात्री २ वाजता आला. त्यानंतर अग्निशामक अधिकारी राजेश जगताप, चालक ज्ञानेश्वर खेडेकर, अग्निशामक दलाचे जवान किशोर बने, दिलीप घाडशी, संदिप कार्ले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत उड्या टाकत प्रवेश केला आणि दोरी, लाइफ जॅकेट आणि इतर उपकरणे वापरून कुटुंबातील लालवाणी कुटुंबातील सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जमलेल्या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले तर अग्निशामक दलाने बचावकार्य केले.