पुणे : पुण्यातील बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराशेजारील लाकडीवाड्याला मंगळवारी ( 22 एप्रिल ) मध्यरात्री भीषण आग लागली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आगीची भीषणता इतकी मोठी होती की अग्निशामक गाड्या आणि 50 जवानांनी ही आग विझवली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री दगडूशेठ हलवाई मंदिराशेजारील लाकडीवाड्याला आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने 10 अग्निशमन गाड्या, 5 अधिकारी आणि 50 जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर अखेर आग विझवण्यात आली. मात्र दुमजली लाकडी वाडा पूर्णपणे जळून खाक झाला असून पडलेल्या वाड्याचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान वाड्यात आणि दुकानांमध्ये असलेल्या जवळपास आठ ते दहा नागरिकांना आगीची चाहूल लागताच त्यांनी सतर्कता दाखवत ते वेळीच बाहेर धावल्याने त्यांचे प्राण वाचले. सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.