केरळ : दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. यासाठी ठिकठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. विक्रीसाठीचे फटाके सुरक्षित ठिकाणी रचून ठेवलेले असतात. पण अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर फटाके एका ठिकाणी ठेवले असताना त्यांची काळजी घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरतं. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
केरळमध्ये अशीच एक दुर्घटना घडली आहे. वीरारकवू मंदिर महोत्सवात मोठ्या प्रमाणावर फटाके मागवण्यात आले असून, मंदिर परिसरातच एका बाजूला हे फटाके रचून ठेवले होते. पण याच ठिकाणी आग लागून मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना केरळच्या नीलेश्वरम भागात सोमवारी मध्यरात्री वीरारकवू मंदिर महोत्सवात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, केरळच्या नीलेश्वरम वीरारकवू महोत्सव सुरु होता. त्यावेळी वीरारकवू महोत्सवात आतिषबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फटाके मागवले होते. मंदिर परिसरातच एका बाजूला हे फटाके रचून ठेवण्यात आले होते. पण या ठिकाणी आग लागून मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. मंदिरात महोत्सव असल्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक भक्त जमा झाले होते.
दरम्यान, फटाक्याला लागलेल्या आगीमुळे तब्बल १५० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असून चिंताजनक आहे. जखमीं व्यक्तींवर कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू भागातील रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. या घटनेची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. पोलीस पथकासह स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली आहे. या दुर्दैवी घटनेचं नेमकं काय कारण ठरलं, पुढील तपास सध्या चालू आहे.