निंबुत : निंबुत (ता. बारामती) येथील आनंदनगर नीरा-बारामती रोडवर तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची चेन लुटली. याप्रकरणी सुभाष विष्णू आगवणे (वय ६५) यांनी करंजेपूल पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी सुभाष विष्णू आगवणे दुचाकीवरून बारामती रस्त्याने निंबुतकडे जात होते. त्यावेळी आनंदनगर येथे तीन अज्ञातांनी थांबविले. आम्ही पोलीस आहोत, लोणंद येथे जबरी दरोडा पडल्यामुळे आम्ही रोडला तपासणी करत आहे. आम्हाला तुमची झडती घ्यायची आहे, असे सांगितले. त्यांच्या गळ्यातील तीन ग्रॅम वजनाची सोनसाखळी रुमालात ठेवण्यास सांगून हातचलाखीने चेन काढून घेत रुमाल त्यांच्याकडे दिला.
दरम्यान, आगवणे यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यामध्ये ठेवलेली तीन तोळे वजनाची सोन्याची चेन चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी करंजेपूल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहेत.