कोरेगाव : कोरेगाव रेल्वेस्टेशन पार्किंगमध्ये सैन्य दलातील जवानाला गुरुवारी सकाळी सासरवाडीच्या काही जणांनी मारहाण केली. यानंतर संशयितांनी जवानाची पत्नी व मुलींनाही सोबत नेल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद कोरेगाव पोलिस ठाण्यात झाली असून ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम आण्णा आप्पा वडार (रा. किर्लोस्करवाडी ता. पलूस, जि. सांगली), सुनिल लक्ष्मण साळुंखे (रा. उगार, ता. अथणी, जि. बेळगाव) यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात्त आला आहे. याप्रकरणी जवान दिलीप भिमराव धोत्रे (वय ३२, रा. गोळेवाडी, ता. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
जवान दिलीप धोत्रे हे सुट्टीसाठी गावी आले होते. त्यांची सुट्टी संपल्यानंतर ड्युटीवर जाण्यासाठी ते रेल्वे स्टेशनर बुकींग करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासह त्यांची आई, भाऊ, पत्नी व दोन मुली होत्या. धोत्रे सकाळी ८.३० वाजता रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये आले असताना संशयितांनी त्यांना अचानक मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच आई, भाऊ व पत्नीला शिवीगाळ केली. यामध्ये धोत्रे व त्यांचा भाऊ अंकुश यांना संशयितांनी जबर मारहाण केली. यानंतर संशयितांनी त्यांची पत्नी काजल, मुली ओवी व श्रुती यांना सोबत नेले.