पिंपरी (पुणे) : पावसाने रस्त्यावरील पाणी दुचाकीस्वार तरुणांच्या अंगावर उडाल्याने झालेल्या वादातून फॉर्च्यूनरमधील सात जणांनी तीन तरुणांना बेदम मारहाण केली. ही घटना चाकण येथे मेदनकरवाडी परिसरात शनिवारी (दि. २८) दुपारी घडली. याप्रकरणी आदित्य कैलास शिदि (वय १८, रा. मातोश्री निवास, चाकण) यांनी रविवारी (दि. २८) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रेयस अरुण कुसाळकर (वय १९), श्रीपाद कसाळकर, मिथुन माने, निखील शेलार, महेश मोहन राज (वय ३७, सर्व रा. चाकण), व इतर दोघेजण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी श्रेयस कुसाळकर आणि महेश राज या दोघांना अटक केली आहे.
फिर्यादी व त्यांचा मित्र शनिवारी दुपारी चहा पिण्यासाठी दुचाकीवर जात असता मेदनकरवाडीतून बालाजीनगरकडे जाणाऱ्या फॉर्च्यूनरने (एमएच १४ केयू २४९८) रस्त्यावरील पावसाचे साचलेले पाणी फिर्यादीच्या अंगावर उडाले. याबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व त्यांचे मित्र कृष्णा आणि अजय यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी व त्यांच्या मित्रांना रॉड, चामड्याचा पट्टा व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत ‘तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर तुम्हाला मारून टाकू,’ अशी धमकी दिली. तसेच परिसरात दहशत पसरवली. या प्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.