कोल्हापूर : राजारामपुरी येथील मंडळांनी शुक्रवार, ७ सप्टेंबर रोजी गणेश आगमन मिरवणूक काढली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त नेमला होता; मात्र काही कार्यकर्ते मिरवणूक रेंगाळण्याचा प्रयत्न करीत होते. अशावेळी पोलीस व कार्यकर्ते यांच्यात वादावादीचे प्रसंग घडत होते. जनता बाजार चौकातून मिरवणूक पुढे नेण्यास सांगितल्याच्या रागातून सराईत गुन्हेगार सूरज तानाजी नलवडे (वय ३३, रा. शाहूनगर) याने पोलीस उपनिरीक्षक रूपाली भीमराव पवार यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ही राजारामपुरी येथील घटना घडली. याबाबत उपनिरीक्षक पवार यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नलवडे याला अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक पवार या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागात नेमणुकीस आहेत. शनिवारी सहकाऱ्यांसह जनता बाजार चौकात बंदोबस्ताठी तैनात होत्या. रात्री साडेअकराच्या सुमारास कीर्ती तालीम मंडळाचा गणपती मिरवणुकीतून जनता बाजार चौकात पोहोचला. बराच वेळ एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मंडळांना पुढे सरकण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जात होत्या.
त्यावेळी उपनिरीक्षक पवार यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना वाहन पुढे घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने सराईत गुन्हेगार सूरज नलवडे याने पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घातला, ‘मी पुढे जात नाही. काय करायचं ते करा,’ असे म्हणत त्या प्रेलिसांना धक्काबुक्की केली. सार्वजनिक ठिकाणी पोलिसांना दमदाटी करून शासकीय कामात हस्तक्षेप केल्याबद्दल उपनिरीक्षक पवार यांनी नलवडे याच्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.