सांगली: मिरजेत दारू पिण्यास पैसे मागण्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीत एकावर ब्लेडने वार करण्यात आले. तर, एकास तिघांनी काठीने मारहाण केली. ही घटना गुरुवार. २८ रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास मालगाव येथील शिवाजी चौकात घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी बहादूर चाँद देसाई (रा. मालगाव) तसेच गौस बाबासो मुजावर, राजू बाबासो मुजावर आणि आयान राजू मुजावर (सर्व रा. मालगाव, ता. मिरज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी गौस मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गौस हे सकाळी सातच्या सुमारास मालगाव येथील शिवाजी चौकात थांबले होते. साधारण ७.३० च्या सुमारास तेथे संशयित बहादूर देसाई आला. त्याने दारु पिण्यासाठी गौस मुजावर यांच्याकडे पैसे मागितले. मात्र गौस याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या संशयित बहादूर याने त्याच्या हातातील ब्लेडने गौस मुजावर याच्या मानेवर, गालावर, हातावर वार करुन जखमी केले. तर फिर्यादी इन्तियाज बहादूर देसाई (रा. कोंडी, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सकाळच्या सुमारास शिवाजी चौकात थांबलेले संशयित गौस, राजू आणि आयान मुजावर यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी फिर्यादी इन्तियाज यांचे पती बहादूर यांना तिघांनी काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.