पिंपरी (पुणे) : व्यवसायाचा तब्बल एक कोटी १९ लाख २२ हजार ३१८ रुपये विक्री कर थकवल्या प्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाने तळवडे येथील एका व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार १२ ऑगस्ट २०१४ ते ७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडला. मेसर्स सिद्धार्थ सेल्स इंडस्ट्रीजचे प्रोप्रायटर आसुलाल एच बिष्णोई (रा. तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वस्तू व सेवाकर विभागातील अधिकारी शलाका शिवानंद कडणे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मेसर्स सिद्धार्थ सेल्स इंडस्ट्रीजचे प्रोप्रायटर आसुलाल एच बिष्णोई यांनी एक कोटी १९ लाख २२ हजार ३१८ रुपयांची थकबाकी व्हॅट कायद्यांतर्गत थकवली. सन २००९-१० आणि २०१०-११ या कालावधीचे निर्धारणा आदेश वस्तू व सेवा कर विभागाकडून पारित करण्यात आले. त्याची मागणी नोटीस सुद्धा पारित करण्यात आली. मात्र बिष्णोई यांनी कराची थकबाकी अद्याप भरली नाही. वस्तू व सेवाकर विभागाने बिष्णोई यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कराची रक्कम न भरल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.