भिगवण (पुणे): दुचाकीवरून पाण्याचा जार घेऊन जाताना एक जणास धक्का लागल्याच्या कारणावरून दोघा शाळकरी मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. यावरून भिगवण मधील १६ जणांवर त्याचप्रमाणे १० ते १२ अनोळखी इसम अशा २६ जणांवर भिगवण पोलिस ठाण्यात किती कायदेशीर जमाव करून जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार मंगळवार १७ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास भिगवणमधील श्रीनाथ चौकामध्ये घडला.
प्रक्षय भरणे, अमोल वाघ, अमित वाघ, असुल गाडे, रोहीत गाडे, साहिल गाडे, विजय गुणवरे, अजय गुणरे, अंकुश गाडे, राहुल गाडे, रोहीत भरणे, बाळा भरणे, ऋतीक चव्हाण (गुणवरे), सनी जाधव, विशाल गाडे, भावेश नामदेव धवडे (सर्व रा. भिगवण, श्रीनाथ चौक, ता. इंदापुर, जि. पुणे) व इत्तर १० ते १२ अनोळखी इसम (नाव पत्ता माहीती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सिध्देश तानाजी शेलार (वय१५ रा. भिगवण ता इंदापूर) याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश शेलार व अर्जुन शेलार हे मोटार सायकलवरून पाण्याचा जार घेऊन जात असताना एका इसमास धक्का लागला. यावरून दहा-बारा जणांच्या टोळक्यांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली व जातिवाचक शिवीगाळ देखील केली. अक्षय भरणे याने फिर्यादीचा पाण्याचा जार घेऊन फिर्यादींचा मित्र अर्जुन शेलार याच्या डोक्यात मारला. तसेच लोखंडी गजाने त्याच्या मानेवर मारून दुखापत केली. रोहीत गाडे व राहुल गाडे यांनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तर अमोल वाघ याने तुम्हाला आता सोडत नाही, तुम्हाला गोळ्याच घालतो, अशी धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. यावरून सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकार समजताच घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्यासह बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी भेट दिली व घटनेची गांभीर्यता तपासली. सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर संतापलेल्या जमावाने आरोपींना अटक करावी व त्यांच्या कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा अमर बौद्ध युवक संघटनेच्या वतीने भिगवण बंदचे आवाहन करण्यात येईल, असे सांगितले.
बुधवारी अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट घेऊन जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. वस्तुनिष्ठ तपास करण्याचे आदेश भिगवण पोलिसांना देण्यात आल्याचे बिरादार यांनी यावेळी सांगितले. कोणीही कायदा हाती घेऊ नये, त्याचप्रमाणे सर्वांनी भिगवणमध्ये शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.