पुणे : पावसाळ्यामध्ये पुराचे पाणी शिरणाऱ्या २९ ठिकाणच्या कुटुंबांचे स्थलांतर करण्यासाठी आत्तापासूनच जागा शोधा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासनाला दिले आहेत. सिंहगड रोड परिसरात मुठा नदीच्या पुराचे पाणी शिरले होते. यावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागातही आरोप-प्रत्यारोप झाले होते.
त्यामुळे पुराचे खरे कारण शोधण्यासाठी आयुक्त भोसले यांनी चार सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर नुकतीच समितीची पहिली बैठक झाली. या समितीचे सदस्य अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी या बैठकीविषयी माहिती दिली.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, समितीचे सदस्य, पाटबंधारे विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनी पुढच्या वर्षी पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपत्कालीन कामे करण्याची सूचना केली, तर भविष्यातील धोका टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरामध्ये पावसाळ्यात मुठा-मुळा नदी आणि इतर ओढ्या-नाल्यांचे पाणी शिरते अशी २९ ठिकाणे आहेत. या भागांत बाधित होणाऱ्या कुटुंबीयांचे पावसाळ्याच्या कालावधीत तात्पुरते स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्यासाठी आत्तापासूनच जागा शोधण्यास सुरुवात करा, असे आदेश आयुक्त डॉ. भोसले यांनी दिले आहेत.
शहरात अनेक भागांत पर्जन्यमापक बसवावे, त्याची नोंद आपत्कालीन परिस्थिती विभागाकडे करावी, अशा प्रकारच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. दरम्यान, पावसाळ्यात उदभवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि आवश्यक ती कामे करण्यासाठी आगामी अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.