लोणी काळभोर, (पुणे) : पोल्ट्री चालकांकडून चिकन (जिवंत कोंबडी) खरेदीचे दर ७० ते ७५ रुपये असताना दुकानदार मात्र ग्राहकांना तेच चिकन २५० ते ३०० रुपये किलो दराने विकत आहेत. जिल्ह्यात चिकनचे दर कमी झाले असले तरी लोणी काळभोर, उरुळी कांचनसह हडपसर परिसरात चिकनचे दर अव्वाच्या सव्वा असल्याच्या कारणाने नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे.
खाद्याचे दर वाढलेले असताना व्यापारी कमी दरात कोंबड्यांची खरेदी करीत आहेत. मात्र, किरकोळ बाजारात प्रतिकिलो ११० ते ११५ रुपये विकल्या जाणाऱ्या कोंबड्यांना घाऊक बाजारात फक्त ७० ते ७५ रुपये प्रतिकिलो दर मिळतो आहे. उत्पादन खर्च आणि घाऊक दर यांच्यात ताळमेळ जुळत नसल्याने अनेक शेतकरी आणि पोल्ट्री संचालक हवालदिल झालेले आहेत. कोंबड्यांचे पालन पोषण करणे, निगा राखण्यापेक्षाही अतिशय अल्प किंमत पोल्ट्री संचालकांना मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला उतरती कळा आली आहे.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीत बॉयलर कोंबडीचा पुरवठा कमी असल्यामुळे चिकनने २५० ते ३०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. व ते तसाच आहे. आषाढ महिना सुरू असून बॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग दरात मोठी घसरण झाली आहे. मात्र इतर तालुक्यात चिकन १६० ते १८० रुपयांपर्यंत मिळत आहे. त्यामुळे तेथील ग्राहकांची चंगळ झाली आहे. तर पूर्व हवेलीतील खवय्यांची चिकन विक्रेते लूट करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण आहे. तर चिकन दुकानदारांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांची साखळीच या प्रकाराला जबाबदार असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आषाढ महिन्यात चांगला बाजार मिळतो, असे गृहीत धरून अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी बॉयलर कोंबडीचे संगोपन केले. त्यामुळे बाजारात बॉयलर कोंबडीची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजारभाव गडगडले आहेत. मात्र पूर्व हवेलीतील चिकन दुकानदार हे अद्यापही चढ्या दरानेच विक्री करत आहेत.