पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींवर बंदी कायमस्वरुपी उठवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे. राज्यासह देशभरातील बैलगाडा प्रेमी, संघटनांचे पदाधिकारी यांचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यासह अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे, संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर यांच्या टीमने गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत मुक्काम केला आहे. बुधवारी या सुनावणीला सुरूवात झाली. त्यानंतर पुन्हा गुरूवारी दुपारी दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद करण्यात आला.
बैलगाडा शर्यतीबाबत अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सलग चालू आहे. तमिळनाडूच्या वतीने सीनियर कौन्सिल मुकुल रोहोतगी यांनी जोरदार यूक्तिवाद करत जल्लीकट्टूबाबत प्राचीन संस्कृती परंपरा ,सरकारने केलेला कायदा याबाबत अभ्यासपूर्ण निवेदन केले. तसेच, राज्यातील अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून ॲड. आनंद लांडगे यांनी महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा सक्षम असल्याचे सांगत मागील वर्षी न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर राज्यात नियमानुसार शर्यती चालू आहेत तसेच कोणताही गैरप्रकार होत नसल्याचे युक्तीवाद केला, अशी माहिती संदीप बोदगे यांनी दिली.
महिनाभरात अंतिम निकालाचा अंदाज – महेश लांडगे
आमदार महेश लांडगे म्हणाले की, महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचे बाजूने राज्य शासनाकडून सिनियर कौन्सिल तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीची संस्कृती परंपरा शासनाने केलेला कायदा शासनाने धावण्याच्या क्षमतेबाबत नेमलेली समिती इत्यादी बाबींचा उल्लेख करत न्यायालयाचे लक्ष वेधले. राज्य शासनाच्या वतीने दुसरे सीनियर कौन्सिल सिद्धार्थ भटनगर यांनीही युक्तिवाद केला. उद्या दुपारी दोन वाजता सुनावणी चालू होईल व उद्या सुनावणी पूर्ण होईल. निकाल महिनाभरात लागेल असा अंदाज आहे.