कर्जत : कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘महिला-मुलींनो तुम्हाला जर तुम्हाला कुणीही ज्ञात-अज्ञात त्रास देत असेल तर मनात कोणतीही भीती न बाळगता बिनधास्तपणे पुढे या. तुमच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करून छेडछाड करणाऱ्यांचा तात्काळ बंदोबस्त करू’ असा विश्वास कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केला.
राशीन (ता. कर्जत) येथील जगदंबा विद्यालयात शाळा-महाविद्यालयात जाऊन हजारो विद्यार्थिनींशी संवाद साधला यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव बोलत होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप खंडागळे, उपमुख्याध्यापक तावरे, पर्यवेक्षक राजेंद्र साळवे आदींसह शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे बोलताना यादव म्हणाले, “महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व त्यांच्या मनात असलेली भीती घालवण्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्यासाठी कर्जत पोलिसांनी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. पोलीसांनी सुरू केलेल्या भरोसा सेल तसेच अनेक उपाययोजनांची माहिती त्यांना पटवून दिली
पोलिसांबद्दलची भीती कमी व्हावी यासाठी विद्यार्थिनींना पोलीस ठाण्याची सहल करण्यात आली. तक्रार कशी दाखल करावी? कोणाकडे करावी? तसेच त्यांना पोलिस करत असलेल्या कामांची व वेगवेगळ्या विभागांची माहिती देण्यात आली. ज्यावेळी महिला व मुलींवर अन्याय होतो त्यावेळी अनेक मुली झालेल्या त्रासाबद्दल वाच्यता करत नाहीत.
दरम्याण, सार्वजनिक ठिकाणी गर्दीचा फायदा घेत स्पर्श करण्याचा प्रयत्न होतो, अश्लील हावभाव किंवा वाईट नजरेने खुणावले जाते. बस स्थानक किंवा बसेसमध्ये बसताना मुद्दाम जवळ बसण्याचा व लगट करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अशा घटनांना चाप बसवण्यासाठी कर्जत पोलिसांकडून गेली दीड वर्षांपासून गांभीर्याने दखल घेतली जात आहे. महिला व मुलींच्या शेकडो तक्रारिंचे निवारण करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कौतुकास्पद काम कर्जत पोलिसांनी केलेले आहे.कुणी त्रास दिल्यास पोलीस निरीक्षकांनी स्वतःचा मोबाईल क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे.
आता शाळेतही पोलीस संपर्क फलक!
“शाळेतील महिला-मुलींना संकटकाळी आपल्या संरक्षणासाठी पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी ‘पोलीस संपर्क फलक’ लावण्यात आला आहे. असे असतानाही शाळा भरताना किंवा सुटताना जर आवश्यकता असेल तर पोलीस संरक्षणही दिले जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक यादव यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एम. जगताप यांनी तर आभार दिलीप खंडागळे यांनी मानले.