लोणी काळभोर: खऱ्या-खोट्या नकाशावरून सुरु झालेला वाद पेटून तो थेट 50 लाख रुपयांच्या पैजेपासून ते गाव सोडण्यापर्यंत पोहचला. लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व फुरसुंगी या दरम्यानच्या शिवरस्त्याचा वाद कदमवाकवस्तीच्या ग्रामसभेत चांगलाच गाजला. यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये पीएमआरडीए रस्ता, पाणी व कचऱ्याच्या प्रश्नांवरून खडाजंगी झाली. हा वाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारी जाऊन समस्या सोडविण्यापर्यंत शिगेला गेला. अजित दादा देतील ते निर्णय घेऊ मान्य करू, असे म्हणून तो वाद अखेर मिटला.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी जिल्हा परिषद शाळेत बुधवारी (ता.25) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रामसभा उपसरपंच नासीरखान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी सरपंच गौरी गायकवाड, नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, कोमल काळभोर, बिना काळभोर, रूपाली काळभोर, अभिजीत बडदे, मंदाकिनी नामूगडे, अशोक शिंदे, दीपक आढाळे, सुशील महाराज काळभोर, मुकुल काळभोर, प्रीतम काळभोर, नितीन टिळेकर, विशाल गुजर, ऍडव्होकेट राहुल झेंडे, अविनाश बडदे, गौरव काळभोर, प्रतीक काळभोर, नितीन लोखंडे, पोलीस पाटील प्रियंका भिसे, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना चित्तरंजन गायकवाड म्हणाले की, कदमवाकवस्ती गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरीकरणाचा वेग हा प्रचंड आहे. नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच गावातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक घरातून एनजीओ या संस्थेमार्फत कचरा गोळा करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक नागरिकाला प्रतिमाह 60 रुपये त्या संस्थेला द्यावे लागतील. गावात कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर विद्रुपकरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. गावाच्या नकाशात पडलेले सर्व पीएमआरडीचे रस्ते खुले करण्यात यावेत. शेतकऱ्यांना लवकर मोबदला मिळावा, यासाठी ग्रामपंचायतमध्ये मदत कक्ष उभारण्यात यावा. तसेच कदमवाकवस्ती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पीएमआरडीएचा रस्ता व शिवरस्ता व्हावा, अशी मागणी केली.
पीएमआरडीए व शिवरस्त्याच्या मागणीवर बोलताना माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर व गौरव काळभोर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतातून अगोदरच 100 फुटाचा डीपी रोड गेला आहे. त्यानंतर 100 फुटावरूनच जर शिव रस्ता जाणार असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. दोन्ही रस्ते झाले तर शेतकरी वर्ग हवालदिल होऊन त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे डीपी रोडचा प्रस्ताव रद्द करा अथवा दोन्हीपैकी कोणताही एक रस्ता करा. त्याला आमचा सर्वानुमते पाठींबा आहे, अशी भूमिका घेतली. तसेच पाण्याची पाईपलाईन माळवाडी व ग्रामपंचायतीला कोठून आणणार? व पुणे-सोलापूर महामार्गावरून का आणणार नाहीत? असा सवाल केला.
View this post on Instagram
यावर उत्तर देताना चित्तरंजन गायकवाड म्हणाले, ग्रामपंचायतीला येणारी पाईपलाईन ही वाकवस्तीच्या रस्त्याने येणार आहे. तर माळवाडीला जाणारी पाईपलाईन ही फुरसुंगी व कदमवस्तीच्या शिव रस्त्यावरून येणार आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला परवानगी मिळत नाही आणि परवानगी मिळाली, तर महामार्ग लगत असलेल्या सेवा रस्त्याच्या जवळून मिळते. तसेच जर पाईपलाईनची देखभाल व दुरुस्ती करण्याची वेळ आली, तर पुन्हा एनएचएआयची परवानगी घ्यावी लागते. यासाठी खूप मोठा कालावधी लागतो. त्यामुळे नागरिकांना फायदा होण्याऐवजी जास्त तोटा सहन करावा लागेल. त्यामुळे गायकवाड यांनी पाण्याची पाईपलाईन शिव रस्त्यावरून नेण्यासाठी आग्रह धरला.
दरम्यान, डीपी रोड व शिव रस्ता या दोन्हीपैकी एक रोडकरण्यात यावा, यावर विरोधक व सत्ताधारी यांच्यात एकमत झाले. याबाबत दोन्ही बाजूकडील शिष्टमंडळ लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या विषयावर कायमचा तोडगा करणार आहेत. अजितदादा जो निर्णय देतील, तो दोन्ही बाजूने मान्य करण्याचे ठरवले आहे. तसेच या ग्रामसभेत 11 गुंठ्यांचे सामाईक खरेदीखत झालेल्या क्षेत्राची नोंदी सातबारा उताऱ्यावर केल्या जात नाहीत. शासनाच्या नियमाप्रमाणे सातबारा उताऱ्यावरील नोंदी झाल्या पाहिजेत. सर्वांनी कर जमा करावा. नळ पाणीपुरवठा योजनेसाठी गावातील दानशुरांनी लोकवर्गणी जमा करावी, या सारख्या विषयांवर ग्रामसभेत चर्चा झाली.
ग्रामसभेत लागली 50 लाखांची पैज
शिव रस्त्यावरून विरोधक व सत्ताधारी आक्रमक झाले होते. शिव रस्त्याचा भूमी अभिलेख कार्यालयाचा नकाशा खरा-खोटा यावरून हा वाद पेटला होता. यावरून माझाच नकाशा हा खरा आहे, असे सांगत सत्ताधारी असलेले चित्तरंजन गायकवाड यांनी 50 लाखांची पैज लावली होती. एवढ्यावरच न थांबता खोटा नकाशा सिद्ध केला, तर गाव सोडून देतो, असे देखील सांगितले होते. ग्रामसभेत वातावरण चांगलेच तापले असतानाच, अचानक विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये समेट झाला आणि ही पैज केवळ नावापुरतीच उरली.