जेजुरी : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करणे, वारंवार पैशांची मागणी करणे आणि सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून बदनामी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, दौंडज येथील आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्रात महिला कर्मचारी रुग्णसेवेचे शासकीय काम करत असताना तिच्या पतीने केंद्रात घुसून तिला मारहाण केली आणि तिचा मोबाईल हिसकावून नेल्याची तक्रार जेजुरी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने पती श्रीकांत विठ्ठल जावळे आणि सासू जिजा विठ्ठल जावळे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2018 पासून पतीकडून घरखर्च, किराणा, प्रसूतीचा खर्च आणि मुलीच्या संगोपनासाठी माहेरून पैसे आणण्यावरून वारंवार मारहाण व मानसिक छळ केला जात होता. पती कोणताही व्यवसाय करत नसल्याने पत्नीच्या पगारावरच घरखर्च अवलंबून होता. पत्नीने पगार पतीच्या खात्यावर जमा करावा, यासाठीही तिचा छळ केला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
2020 ते 2025 या काळात पतीने तिच्या नावावर तब्बल 19 बँक कर्जे घेतल्याचाही आरोप आहे. फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पत्नीचे एक तोळ्याचे मंगळसूत्र गहाण ठेवून 80 हजार रुपये घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून शिवीगाळ व धमक्या दिल्या जात होत्या. पत्नीचा व्हिडिओ तयार करून तो स्वतःच्या सोशल मीडिया स्टेटसवर टाकत बदनामी केल्याचाही आरोप आहे.

शासकीय कामात घुसून मारहाण

31 ऑक्टोबर रोजी दिपाली दौंडज येथील आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्रात अॅप्रन व ओळखपत्र घालून रुग्णसेवेचे काम करत असताना पती श्रीकांत तेथे आला. त्याने शिवीगाळ करत कर्मचाऱ्यांसमक्ष पत्नीला हाताने मारहाण केली आणि तिचा मोबाईल घेऊन गेला. या मारहाणीत तिच्या नाकातून व तोंडातून रक्त आल्याने तिला प्रथम जेजुरी ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. उपचारानंतर 1 नोव्हेंबर रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला.
त्यानंतरही पतीने तिच्या मोबाईलचा वापर करून कामावरील सहकाऱ्यांना संदेश पाठवत बदनामी केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच सासूने जेजुरी येथील घरी येऊन शिवीगाळ व घटस्फोट देण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी जेजुरी पोलिसांकडे पती आणि सासूविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.







