पुणे : पुण्यातील नाना पेठ येथील एका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. यावेळी दरवाजात पोलिस आल्याचे पाहून २५ वर्षीय इव्हेंट मॅनेजरने दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तर पोलिसांच्या कारवाईने दुसऱ्या मजल्यावरून बाईकने खाली उतरलेला व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर देखील उपचार सुरु आहेत. ब्रायन रुडॉल्फ गिअर (रा. बाणेर, पुणे) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कारवाईसाठी गेले असताना, सदर ठिकाणी फ्लॅटचा दरवाजा बंद असल्याने बेल वाजवली. त्यावेळी एका व्यक्तीने दरवाजा उघडला. मात्र सेफ्टी दरवाजा न उघडता दरवाजा पुन्हा बंद केला. त्यानंतर बिल्डिंगच्या खाली एक व्यक्ती पडल्याचे समजल्याने त्या ठिकाणी पोलिसांनी स्टाफसह जाऊन पाहणी केली असता, एक इसम जखमी अवस्थेत पडल्याचे आढळून आले.
त्याला तातडीने लोकांच्या मदतीने रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा घराची पाहणी केली. त्यावेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे कोणताही जुगाराचा गैरप्रकार आढळून आलेला नाही. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनेवेळी सदर फ्लॅटमध्ये आणखी तीन ते चार व्यक्ती होते. मात्र ते या गोंधळानंतर पसार झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.