Fasting in Shravana पुणे : यंदा दोन श्रावण मास असल्याने श्रावण महिन्यात केले जाणारे व्रतवैकल्य कधी करायचे? श्रावण सोमवारचे उपवास नेमके कधी करायचे? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. (Fasting in Shravana) मात्र हे सगळे व्रत, उपवास १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत करावे, अधिक मासात करु नयेत. असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी स्पष्ट सांगितले केले. (Fasting in Shravana)
अधिक माहिती देताना मोहन दाते म्हणाले कि, दर तीन वर्षांत एकदा कोणता तरी महिना अधिकमास येतो. दर १९ वर्षांनी पुन्हा तोच महिना अधिकमास येतो, असा एक साधारण नियम आहे. यंदाच्या वर्षी श्रावण महिना अधिक आला आहे. त्यामुळे काही लोकांच्या मनात आठ श्रावण सोमवार असल्याच्या शंका उपस्थित होत आहेत. यापूर्वी २००४ मध्ये अधिक श्रावण महिना आला होता. यावर्षी श्रावण अधिक असल्याने श्रावण मासात केली जाणारी सर्व वार व्रते नीज मासात म्हणजेच १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत करावेत.
दरम्यान, अधिक श्रावण महिना १८ जुलै ते १६ ऑगस्टपर्यंत असून त्यानंतर १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत नीज श्रावण मास असणार आहे. श्रावण महिन्यातील सर्व व्रते, सोमवारचे उपवास, मंगळागौर पूजन आदी याच नीज श्रावण (शुद्ध) महिन्यात करावे. त्यामुळे महाराष्ट्रात श्रावणाचे आठ सोमवार नाहीत. केवळ चार श्रावण सोमवार असतील, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली.
यावर्षी अधिक महिन्यामुळे गणपतीचे आगमन हे जवळपास १९ ते २० दिवस उशिराने होणार आहे. अर्थात १९ सप्टेंबरला गणरायचे आगमन होणार आहे. अधिक श्रावण महिन्यांमध्ये विष्णूच्या पित्यर्थ दानधर्म, जप, पूजा, अनुष्टान, याग इत्यादी गोष्टी करायच्या आहेत. लग्न, मुंज, वास्तुशांत इत्यादी गोष्टी या अधिक महिन्यात करता येणार नाहीत. पण व्यावहारिक गोष्टी आहेत जसे साखरपुडा, बारसा या गोष्टी या अधिक महिन्यांमध्ये देखील करता येतील, अशी माहिती देखील पंचांगकर्ते मोहन दाते यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
‘शेवटच्या दिवशीच दीप पूजा करावी’
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात. श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमवस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. मात्र ही पूजा अधिक श्रावण महिना सुरु होण्याआधी करावी की नीज श्रावण महिना सुरु होण्याआधी करावी असा प्रश्न देखील काही जण विचारत आहेत. मात्र दिव्यांची पूजा ही आषाढ महिन्यावर आधारित असल्याने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी (ता.१७ जुलै २०२३) रोजीच करावी अशी माहिती मोहन दाते यांनी दिली.