पुणे : महामार्गावरून चारचाकी गाडीतून जाताना टोल हा फास्टॅगच्या माध्यमातून कापला जात होता. मात्र केंद्र सरकार आगामी काळात जीपीएस सॅटेलाइट टेक्नॉलॉजीच्या मदतीने टोल वसुली करण्याची तयारी करत आहे. यामुळे फास्टॅग आणि टोल नाकेही बंद होणार आहेत.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या एक वर्षात देशातले सर्व टोल नाके हटवण्यात येतील, अशी माहिती लोकसभेत दिली होती. या अनुषंगाने सध्या नव्या टेक्नॉलॉजीवर वेगात काम सुरू आहे, असे वृत्त ‘एका हिंदी वाहिनीने’ने दिले आहे.
नव्या टेक्नॉलॉजीमध्ये तुमची कार जितकं अंतर कापेल त्याच आधारावर टोलची रक्कम कापली जाईल. यासाठी दोन प्रकारच्या टेक्नॉलॉजींवर सध्या काम सुरू आहे. पहिल्या टेक्नॉलॉजीनुसार, वाहनात जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली असेल. या प्रणालीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही महामार्गावरून प्रवास करत असाल तेव्हा सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे वाहन मालकाच्या बॅंक खात्यातून थेट टोलचे पैसे कापले जातील.
दुसऱ्या टेक्नॉलॉजी नुसार, तुमच्या वाहनाच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून टोल वसूली होईल. नंबर प्लेटच्या माध्यमातून टोल वसुलीसाठी एक कम्प्युटराईज्ड सिस्टम असेल. त्यातील सॉफ्टवेअरच्या मदतीनं टोल वसूली होईल. या तंत्रानुसार, ज्या ठिकाणाहून गाडी महामार्गावर प्रवेश करेल, तिथं तिच्या माहितीची नोंद होईल. त्यानंतर ज्या पॉईंटवरून गाडी महामार्गाबाहेर जाईल, तिथंही अशाच प्रकारची नोंद होईल. या दरम्यान संबंधित वाहनाने महामार्गावरील जितकं किलोमीटर अंतर कापलं आहे, त्या हिशेबानुसार वाहन मालकाच्या बॅंक खात्यातून टोलची रक्कम कापली जाईल.
दरम्यान, विशेष म्हणजे, या सुविधेमुळे टोल नाक्यांची गरज संपुष्टात येणार असून, टोल नाके बंद होणार आहेत.
सरकार सध्या टोल कर वसुलीसाठी नव्या टेक्नॉलॉजीच्या वापराबाबत काम करत आहे. जर ही टेक्नॉलॉजी प्रत्यक्षात आली तर फास्टॅग सिस्टिम कालबाह्य ठरेल.
याबाबत बोलताना केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले कि, जीपीएसवर आधारित टोल कर कलेक्शन सिस्टीम अनेक युरोपीय देशांमध्ये पूर्वीपासून लागू आहे. तिथे ही सिस्टीम यशस्वी झाली आहे. आणि तिचा वापर आता भारतातही करण्यात येणार आहे.
सध्याच्या नियमांनुसार टोलचा हिशोब करण्यासाठी महामार्गावरील एका टप्प्याचे अंतर सहसा 60 किलोमीटर असते. हे अंतर कमी किंवा जास्त असेल तर त्यानुसार टोलची रक्कम बदलते. परंतु, त्याच मार्गावर एखादा पूल, कल्व्हर्ट किंवा ओव्हरब्रिज असेल तर टोलची रक्कम बदलते. पण नव्या सिस्टीमनुसार, तुमची कार जितके अंतर कापेल त्याच आधारावर टोलची रक्कम कापली जाईल’,