अजित जगताप : पुणे प्राईम न्यूज
वडूज : भारत शेतीप्रधान देश आहे. शेतक-यासंदर्भातील सर्व योजना राबविल्या जातात. शेतक-यांना अल्प व्याजदरात पिककर्ज दिले जाते. त्याचबरोबर शेतक-यांच्या लघुउद्योगासाठी, महिलांच्या बचतगटासाठी, शेतक-यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कर्जपुरवठा,विमा योजना राबविल्या जातात.या भारतीय स्टेट बँकेच्या योजनेचा खटाव-माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे कोल्हापूर विभागाचे उपमहाप्रबंधक श्री महेश्वर नारायण प्रसाद यांनी केले.
निमसोड ता. खटाव येथे भारतीय स्टेट बँक, शाखा वडूज यांच्या वतीने शेतकरी मेळावा झाला होता. त्यावेळी श्री. प्रसाद बोलत होते. यावेळी बँकेचे सातारा क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक संजीत पाठक, वडुजचे शाखधिकारी कैलास सोनवले, कोल्हापुर क्षेत्रीय कार्यालयाचे उपप्रबंधक निलेश साळुंखे, सातारा क्षेत्रिय कार्यालयाचे प्रबंधक काशिनाथ बिराजदार, प्रबंधक शंतनू सिंग, उपप्रबंधक श्रीमान मोरे, निमसोडचे सरपंच महेंद्र देशमुख, गामपंचायत सदस्य शशिकांत मोरे, शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अनिल पवार, गावातील प्रगतशिल शेतकरी सुनिल मोरे, काकासो मोरे, नानासो मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महेश्वर प्रसाद पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. आपल्या सोबत बँक असल्याने कर्ज वितरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे असल्यास कोणती ही अडचण येणार नाही. कर्ज घेणारे शेतकरी स्वकष्टाने ठेवीदार बनले पाहिजेत हाच बँकेचा उद्दिष्ट आहे.
संजीत पाठक म्हणाले, देशातील शेतकरी सबल झाले तर त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. बहुतांश बाजारपेठा या शेतक-यांनी उत्पादन केलेल्या पिकांवर अवलंबुन असतात. त्यामुळे शेतक-यासांठी भारतीय स्टेट बँकेच्या सहकार्याचे पाउल उचलले आहे. त्याचा सर्वांनीच लाभ घेतला पाहिजे.
दरम्यान, वडूज खटाव आणि माण तालुक्यातील शेतक-यांना नक्की कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे जाणून शेतक-यांना मान्यवरांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. श्रीमान मोरे, निलेश साळुंखे, शंतनू सिंग यानीही या मेळाव्यात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमा दरम्यान उपस्थित महिला बचत गट प्रतिनिधी यांना मंजुरी पत्रके व शेतक-यांना कर्जमंजूरी पत्रके वाटण्यात आली.
या शेतकरी मेळाव्याला निमसोड, वडूज,गणेशपेठ,वरुड,एनकुळ, नांदोशी,दाळमोडी, कातरखटाव,गोपूज, औंध,गुरसाळे, चितळी, निढळ,गोंदवले, पिंगळी, मांडवे, पेडगाव, दहिवडी आदी परिसरातून शेतकरी आले होते.कैलास सोनावले यांनी सूत्रसंचालन व आभार काशिनाथ बिराजदार यांनी मानले.