अजित जगताप
सातारा : आता आठ महिने होऊनही लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनांतर्गत विमा कंपनीचा करार होऊ न शकल्याने राज्यातील मृत्यू व गंभीर जखमी झालेल्या शेतकरी कुटूंबाला आर्थिक मदत मिळू शकली नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकरी हिताच्या गप्पा मारणाऱ्या महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधीपक्ष तसेच विविध प्रकारच्या शेतकरी संघटनेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात आली होती. त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला होता. अनेकांनी पदरमोड करून या योजनेसाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी दप्तर दिरंगाईमुळे काही प्रस्ताव मंजूर करण्यात अपयश आले होते. आता तर संबधित विमा कंपनीचा करार संपल्याने आठ महिने आर्थिक मदतीपासून गरीब शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील २१ शेतकऱ्यांचे विमा योजनेचे प्रस्ताव मंजूरीच्या प्रतीक्षेत असल्याचे लेखी उत्तर कृषी विभागाने वडूज ता खटाव येथील शेतकरी विजयकुमार शिंदे यांना देवून वस्तुस्थिती सादर केली आहे. तरीही याबाबत शेतकरी संघटना व शेतकऱ्यांमध्ये जागरूकता नसल्याने विमा कंपनी निवड होऊ शकली नाही, असा आरोप होऊ लागला आहे.
एखाद्या शेतकऱ्याचा शेतीची कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे २ डोळे अथवा २ अवयव निकामी झाल्यास रुपये २ लाख रक्कम नुकसान भरपाई देण्यात येते.या योजनेअंतर्गत विम्याचा हफ्ता भरण्याची आवश्यकता नाही कारण महाराष्ट्र शासन विम्याची रक्कम स्वतः भरते. शेतीची कामे करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकार कडून २ लाखांचे आर्थिक सहाय्य कुटुंबाला देण्यात येते त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.
अर्जदाराने शेतकऱ्याने शासनाच्या इतर कोणत्या अपघातग्रस्त योजनेचा लाभ घेतला असेल तर तो शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ७५ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
खाली दिलेल्या वेगवेगळ्या कारणामुळे शेतकऱ्यांना अपंगत्व किंवा मृत्यू ओढवल्यास या योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंत आर्थिक मदत केली जाते तसेच अपघाताच्या स्वरूपानुसार विमा रक्कम मंजूर केली जाते.अंगावर वीज पडून मृत्यू होणे,नैसर्गिक आपत्ती, पूर ,सर्पदंश ,विंचू दंश ,वाहन अपघात,रस्त्यावरील अपघात विजेचा शॉक लागून मृत्यू, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा,खून,उंचावरून पडून झालेला अपघात
नक्षलवाद्यांकडून हत्या ,हिंस्त्र जनावरांनी चावल्यामुळे मृत्यू किंवा जखमी होणे,दंगल यामध्ये योजनेचा लाभ मिळतो. परंतु,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यास नैसर्गिक मृत्यू ,विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व ,आत्महत्येचा प्रयत्न,आत्महत्या स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेणे,गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात,अमली पदार्थाच्या सेवनामुळे झालेला अपघात,भ्रमिष्टपणा,बाळंतपणातील मृत्यू,
शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात युद्ध,सैन्यातील नोकरी जवळच्या लाभार्थ्यांकडून / वारसाकडून खून या कारणासाठी योजनेचा लाभ घेता येत नाही.असे ही योजनेचे स्वरूप आहे.
परंतु, आता आठ महिने झाले तरी कोणत्याही विमा कंपनीशी राज्य सरकारने करार न केल्याने राज्यातील सुमारे २८ हजार दुर्घटना ग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीत दुःख विसरून काही शेतकरी कुटूंब महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधक यांचे गुणगान गाण्यातच धन्यता मानत आहेत. त्यांनी आत्मचिंतन करावे किंवा या प्रश्नासाठी निदान हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा अशी रास्त मागणी शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे, प्रगतशील शेतकरी अजित कंठे यांनी केली आहे.