पुणे : करमाळा तालुक्यातील गुळसडी परिसरात विजेच्या महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध शेतमजुराला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात पडलेल्या जिवंत वीजवाहिनीच्या संपर्कात आल्याने 60 वर्षीय विजय वसंत क्षीरसागर (रा. गुळसडी) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

गुळसडी ते पांडे मार्गावर असलेल्या हनुमंत उद्धव पाटील यांच्या ऊसाच्या शेतात विजय क्षीरसागर हे गुरुवारी नेहमीप्रमाणे मजुरीने औषध फवारणीचे काम करत होते. दुपारी 2 ते 2.15 वाजेच्या सुमारास काम करत असताना, शेतात आधीच तुटून पडलेल्या महावितरणच्या उघड्या तारेवर त्यांचा अचानक पाय पडला. वीजप्रवाह सुरू असल्याने बसलेल्या तीव्र धक्क्याने त्यांचा जागेवरच अंत झाला.

या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ करमाळा पोलीस ठाणे आणि महावितरण विभागाला अपघाताची कल्पना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून वायरमनने तातडीने परिसराचा वीजपुरवठा खंडित केला, तर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कायदेशीर पंचनामा व पुढील प्रक्रिया पार पाडली.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच भाजप जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, जगदीश अगरवाल आणि पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन नातेवाईकांशी चर्चा केली.
महावितरणचे प्रभारी उपअभियंता बारंगुळे यांनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आणि मयताच्या कुटुंबाला योग्य ती शासकीय भरपाई मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले.
प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला. गुरुवारी उशिरा रात्री गुळसडी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत विजय क्षीरसागर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. शेतातील तुटलेल्या वीजतारांकडे महावितरणचे होणारे दुर्लक्ष निष्पाप शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत असल्याचा संताप या घटनेनंतर परिसरातून व्यक्त केला जात आ







