पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील जाधववाडी एका शेतकऱ्याची कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विकसन करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून शेतजमीन करारनामा करुन घेतली. करारनामा करताना ठरल्याप्रमाणे मोबदला न देता दोन बांधकाम व्यावसायिकांनी शेतकऱ्याची ६ कोटी ६४ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार डिसेंबर २०१३ ते मे २०२४ या कालावधीत जाधववाडी येथे घडला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी हनुमंत निवृत्ती जाधव (वय-५८ रा. जाधववाडी चिखली, ता. हवेली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून
ए.व्ही कार्पोरेशनचे सागर बबनराव मारणे (रा. मारणे बिल्डींग, विठ्ठलवाडी, आकुर्डी), संदीप राम पवळे (रा. विठ्ठल रेसिडेन्सी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मारणे आणि पवळे फिर्यादी जाधव यांची वडिलोपार्जीत शेतजमीन गट नंबर ६६० वरील ३७ आर क्षेत्र विकसनासाठी नोंदणीकृत विकसन करारनामा व कुलमुखत्यार पत्राद्वारे लिहुन घेतली. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ५६ टक्के सदनिका आणि गाळ्यांची विक्री आरोपींनी करावी व उर्वरित ४६ टक्के बांधकाम स्वरूपात येणारा मोबदला फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार असं लिहून घेतलं होतं.
दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांच्या हक्काची फ्लॅटची विक्री करण्याचे अधिकार एजंट म्हणून आरोपींना विश्वासाने दिले. आरोपींनी बाजारभावाप्रमाणे फ्लॅटची विक्री केली. मात्र, आरोपींनी संगनमत करुन विक्रीनंतर मिळालेली रक्कम फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना न देता कुलमुखत्यारधारक म्हणून स्वतःच स्विकारून फिर्यादी यांची ६ कोटी ६४ लाख ४ हजार ३१२ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.