भिवंडी : क्रिकेटच्या मैदानात फलंदाजी करणाऱ्या एका फलंदाजाची फटकेबाजी पाहून एका प्रेक्षकाने मैदानातच धाव घेऊन त्या फलंदाजावर ५०० च्या नोटांचा पाऊस पाडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण-भिवंडी मार्गावरील भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तर दुसरीकडे भारतीय चलनाचा भर मैदानात अपमान झाल्याची टीका नेटकऱ्यांमधून होत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ७०-७० क्रिकेट स्पर्धा कोनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आली होती. या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भाजपचे कल्याण शहराध्यक्ष वरूण पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. तीन दिवस सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या क्रिकेट स्पर्धेचे कल्याण लोकसभेचे खा. डॉ, श्रीकांत शिंदे यांनी फलंदाजी करत फटेकबाजी करून उद्घाटन केले होते.
शेवटच्या दिवशी दोन संघांत क्रिकेट सामना रंगत असतानाच मैदानात गोरसई गावातील पवन केणे नावाचा फलंदाज जोरदार फटकेबाजी करून चौकार, षटकार लगावत त्याने ३५ धावा केल्या होत्या. त्याची फलंदाजी पाहून प्रेक्षक विकास भोईर यांनी मैदानात धाव घेऊन चक्क पवन याच्या अंगावर नोटांचे बंडल भिरकावत अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला. ‘फलंदाज पवन याच्या अंगावर नोटांचे बंडल भिरकावत नोटांचा पाऊस पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.