पुणे : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. या कारवाईत एकूण १ कोटी २० लाख ३२ हजार रुपयांचा माल जप्त केला असून ९ आरोपींना अटक केली आहे. तसेच विदेशी मद्याच्या १६६८ बाटल्या व ५ वाहने जप्त केली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संशयित वाहनांची तपासणी करत असताना गोवा बनावटी मद्याचे ३ बॉक्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाला मिळाले. त्याच्याकडे चौकशीतून नसरापूर येथील एका पत्र्याचे शेडमध्ये छापा टाकला. तेथे ट्रकमध्ये वीटभट्टीसाठी लागणार्या कोळशाची पावडर व गोवा बनावटीचे विविध ब्रांडच्या विदेशी मद्याचे बॉक्स तसेच पत्रा शेडमध्ये थर्माकोलच्या बॉक्समध्ये गोवा बनावटी मद्य मिळून आले.
हे मद्य थर्माकोलच्या बॉक्समध्ये पॅकिंग करुन फ्रुट पल्पच्या नावाखाली गुजरात व इतरत्र पाठविण्यासाठी पॅकिंग केले जात असल्याचे आढळले. या ठिकाणाहून अशोक लेलंड सहा चाकी ट्रक, गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १७१० बाटल्या असा एकूण ५१ लाख ९५ हजार १७० रुपयांचा माल जप्त करुन चौघांना अटक केली आहे.
दुसरी कारवाई निगडी येथील पवळे पुलाखाली भक्ती शक्ती चौक येथे करण्यात आली आहे. गोवा राज्यात विक्रीकरता असलेले विदेशी मद्य व बिअर असा एकूण १ लाख ३४ हजार २३० रुपयांचा मद्यसाठा एका ट्रव्हल कंपनीच्या खासगी बसमधून आणला जात होता. बसचालकाला ताब्यात घेऊन हा साठा जप्त करण्यात आला. हा मद्यसाठा खडकी स्टेशनजवळ वितरीत करण्यात येणार होता.
त्याठिकाणी जाऊन मद्यासह पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यासोबतच २ दुचाकी वाहने व एक सहाचाकी बस जप्त करण्यात आली. या ठिकाणी विदेशी दारुच्या १२६ बाटल्या, बडवायझर बिअरच्या २४ बाटल्या असा एकूण ६८ लाख ३७ हजार ७३० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यात मिळून एकूण १ कोटी २० लाख ३२ हजार ९०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.