पुणे : रुग्णावर शस्त्रक्रिया केली असल्याचे भासवत त्याची बिले शहरी गरीब योजनेअंतर्गत महापालिकेला सादर करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी दिलेल्या दहा हमीपत्रांपैकी केवळ ३ रुग्णांच्या नोंदी आढळून आल्या असून, इतर हमीपत्रांचे नेमका वापर कुठे झाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याप्रकरणी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी शरद प्रकाश चव्हाण (वय ३४) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून डॉ. शोएब नाझीम शेख (वय ३७, रा. रास्ता पेठ) यांच्यावर समर्थ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० ते ३० मे २०२४ या कालावधीत नाना पेठेतील मॉडर्न रुग्णालयात घडला आहे. मात्र, तो आता उघडकीस आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने शहरी गरीब सहाय्य योजना आणि अंशदायी वैद्यकीय सहाय्यता योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधांची तपासणी केली. मॉडर्न रुग्णालयाच्या नावे गेल्या काही दिवसांत दिलेल्या दहा हमीपत्रांपैकी केवळ तीन हमीपत्रधारक रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्याची नोंद आढळून आली होती.
त्याची पाहणी तसेच तपासणी केली असता पेशंट रुग्णालयात अॅडमीट आहे, असे दाखवून हमीपत्र घेतल्याचे स्पष्ट झाले. यासह न केलेल्या शस्त्रक्रियेचे बिलही महापालिकेला सादर करून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रुग्ण रुग्णांच्या खोट्या फाइल बनवून महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. न केलेल्या शस्त्रक्रियेचे बिल महापालिकेला सादर संबधित रुग्णालयाने न केलेल्या शस्त्रक्रियेचे बिल महापालिकेला सादर करुन फसवणूक केली. रुग्णांच्या नावे बनावट प्रकरणे तयार करुन महापालिकेची फसवणूक केली. याप्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.