उरुळी कांचन : लोणी काळभोर पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालयात समाविष्ट झाल्यापासून पासपोर्ट कार्यालयाकडून पूर्व हवेलीतील नागरिकांची अडवणूक होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यामुळे तब्बल दीड वर्षापासून पूर्व हवेलीतील नागरिक हैराण झाले आहे.
यापूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाणे हे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारित कार्यरत होते. तेव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सर्व गावातील नागरिकांना पासपोर्टचा ऑनलाईन फॉर्म भरताना लोणी काळभोर पोलीस ठाणे हा पर्याय उपलब्ध होता. व त्यानुसार तो पर्याय फॉर्मवर भरल्यानंतर पासपोर्ट ऑफिस कडून लोणी काळभोर पोलीस ठाण्याला सदरच्या व्यक्तीचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्यासाठीची प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले जात होते.
गेल्या दीड वर्षापूर्वी जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील लोणी काळभोर पोलीस ठाणे हे पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आले आहे. आणि आता त्याचा सर्व प्रशासकीय कामकाज पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत चालू आहे. मात्र लोणी काळभोर पोलीस ठाणे हे पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारित अॅक्टिव्ह न झाल्यामुळे, काही काळासाठी आपण यवत पोलीस पोलीस ठाण्याचा किंवा हवेली पोलीस ठाण्याचा पर्याय निवडावा व फॉर्म पूर्ण करावा. त्या माध्यमातून आपले पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण होईल, तसे काही काळ झालेही.
सध्या पासपोर्ट ऑफिसकडून अशा पद्धतीने भरलेल्या फॉर्मला चुकीची माहिती भरली म्हणून अर्जदाराला दंड आकारला जात आहे. अशी माहिती ऑनलाईन फॉर्म भरलेल्या काही नागरिकांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दिली. ही बाब धक्कादायक नव्हे तर सर्वसामान्य जनतेवर अन्याय कारक आहे. अशी तक्रार अनेक नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, पासपोर्ट कार्यालयाकडून पूर्व हवेलीतील नागरिकांची अडवणूक होत आहे. यामुळे गेल्या दीड वर्षापासून नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे पासपोर्ट ऑफिसने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देवून आपल्या वेबसाईटवर योग्य ती दुरुस्ती करावी. आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा अखत्यारीतील गावामधील नागरिकांची गैरसोय दूर करावी. अशी मागणी पूर्व हवेलीतील नागरिकांनी केली आहे.