पुणे : गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे, विशेषतः सीएनजीचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे रिक्षाचालकांना मोठा फटका बसत आहे. आता यामुळेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाप्रवाशांच्या खिशाला लवकरच मोठा कात्री लागण्याची शक्यता आहे. रिक्षाचालक संघटनांनी भाडेवाढीची आक्रमक मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या गुरुवारी (23 जुलै) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची (RTA) एक विशेष बैठक पार पडणार असून, त्यात या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते.

काय आहे नवीन भाडेवाढीचा प्रस्ताव?

रिक्षा संघटनांनी खतुआ समितीच्या अहवालानुसार नवीन दर लागू करण्याची मागणी केली आहे. यामध्ये पुढीलप्रमाणे बदल सुचवले आहेत.त्यानुसार पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी सध्याचे भाडे 25 रुपये आहे, ते वाढवून 30 रुपये करण्याची मागणी आहे.दीड किलोमीटरनंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी सध्या 10 रुपये द्यावे लागतात, ते थेट दुप्पट म्हणजेच 20 रुपये प्रति किलोमीटर करण्याचा प्रस्ताव आहे.
पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलैच्या बैठकीत या मागणीवर सविस्तर चर्चा केली जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील आणि नवीन दर कधीपासून लागू करायचे, हे स्पष्ट होईल.
आधीच वाढत्या महागाईमुळे त्रासलेल्या सर्वसामान्य नागरिकांना ही भाडेवाढ मंजूर झाल्यास प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीत जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







