पुणे : महावितरणची बाकी थकवून बिल्डरने पोबारा केल्याने फ्लॅट धारकांना किमान साडे आठ लाख रुपयांचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांनी केलेल्या आंदोलनानंतर महावितरणने वीजबिलात तब्बल साडे तीन लाखांपेक्षा जास्त रक्कमेची सूट दिली असून, बीलाची रक्कम अदा केल्यानंतर लगेच नवीन वीजमीटर जोडणीसाठी प्रक्रिया तात्काळ केली जाणार आहे.
महावितरणची बाकी थकवून बिल्डरने पोबारा केल्याने फ्लॅट धारकांना किमान साडे आठ लाख रुपयांचा फटका बसणार होता. फ्लॅटधारकांना महावितरणचे अधिकारी जुमानत नव्हते व उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने ऐन सणासुदीत या तब्बल ५० फ्लॅटधारकांना अंधारात राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. या बाबतीत भूपेंद्र मोरे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. यामुळे महावितरणच्या अधिकारी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देताना भूपेंद्र मोरे यांच्या मागण्या मंजूर करून बिलाची रक्कम कमी केली.
महावितरणने बीलाच्या रकमेत जवळपास ३५ टक्के सूट दिली आहे. तसेच ‘विलासराव देशमुख अभय योजना’ अंतर्गत अजून बिलात सुट मिळणार असून बिलाची रक्कम कमी होणार आहे.
महावितरणचा भोंगळ कारभार
सन २०१५ साली नऱ्हे गावातील एका इमारतीचे काम सुरू झाले. त्यावेळी महावितरणने बांधकामासाठी लागणारा मीटर वितरीत केला. विकासकाकडून सुमारे दोन महिन्याचे वीजबिल थकाविल्या गेले. त्यानंतर सदर इमारतीमध्ये फ्लॅट विकत घेतलेल्या नागरिकांनी त्या बिलाची भरपाई केली. बांधकाम मीटर ऐवजी घरगुती मीटर लावण्यासाठी अर्ज करण्यात आला. मात्र, महावितरणने १० मीटर लावून दिले. त्यानंतर देखील बांधकाम मीटर सुरूच ठेवले. दिवाळखोर झाल्याने विकासक पळून गेला.
मात्र, त्यानंतर आलेले बील फ्लॅटधारकांनी भरण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर महावितरणने मीटर काढून नेला. सन २०१९च्या सुधारीत शासन निर्णयानुसार बांधकाम व व्यवसायिक मीटर यांच्यातील मीटरभाडे फरक देखील आकारून तब्बल ८ लाख ८६ हजार रुपयांची थकबाकी चढविण्यात आली.
आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलताना आम्हाला बिलात सूट दिली असून यामुळे दिवाळी किमान साजरी करता आली आहे. – दत्तात्रय जवळकर, फ्लॅटधारक
बिल्डरने केलेल्या चुकीची शिक्षा फ्लॅटधारकांना मिळाली असून त्याने केलेल्या फसवणुकीने येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. आता, महावितरणने बिल्डर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. : भूपेंद्र मोरे, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी